बीएलओ शिक्षणसेवकांच्या सोयीसुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

विमा संरक्षण, मानधन वाढीसह विविध मागण्यांचा समावेश
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 29, 2026 20:57 PM
views 25  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात बीएलओ म्हणून कार्यरत शिक्षणसेवकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी बीएलओ कृती समिती, सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मतदार यादी अद्ययावत करणे, क्षेत्रीय पाहणी तसेच ऑनलाइन कामकाज यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या बीएलओ शिक्षणसेवक प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. मात्र, आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यात १२ शिक्षणसेवकांचा मृत्यू झाल्याचे नमूद करत, शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

यावेळी बीएलओ शिक्षणसेवकांनी काही प्रमुख मागण्या मांडल्या. बीएलओ म्हणून केलेल्या कामाचा विचार करून सेवापुस्तिकेत अर्जित रजा समाविष्ट करावी, सन्मानजनक मानधन द्यावे, २० लाख रुपयांचे विमा संरक्षण लागू करावे, ऑनलाइन कामकाजासाठी टॅबलेट व डेटा पॅकची सोय करावी, तसेच क्षेत्रीय कामासाठी पुरेसा प्रवासखर्च देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. या निवेदनावेळी वसंत कदम, मनिषा काकडे, प्रियांका फराकर, निखिल शिंदे आदी उपस्थित होते.