कसई - दोडामार्ग न.पं.च्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Edited by: लवू परब
Published on: April 29, 2026 21:16 PM
views 94  views

दोडामार्ग : कसई - दोडामार्ग नगरपंचायतच्या सर्वांगीण कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला. अपुरी कामे तात्काळ जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेशही प्रशासनाला देत शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागृती करण्याचे आदेश दिले. आढावा घेत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

कसई - दोडामार्ग नगरपंचायतची विकास कामे व सर्वांगीण कामांचा आढावा घेण्यासाठी येथील नगरपंचायतच्या सभागृहात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक रामराव गावकर व नगरपंचायतचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शहरातील विकास कामांची प्रगती, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, नगरपंचायतचे वित्तीय व्यवहार, तसेच प्रशासकीय कार्यपद्धती यांचा बारकाईने आढावा घेण्यासाठीही बैठक आयोजित करण्यात आली होती. 

यावेळी विषय सूचित समाविष्ठ असलेल्या एकूण १९ विषयांवर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यावेळी रस्ते दुरुस्ती, पाणी पुरवठा, स्वछता उपक्रम यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याची तसेच निधी मंजूर करून देण्याची मागणी यावेळी नगरपंचायतने केली.

यावेळी जिल्हाधिकारी बोलताना म्हणाल्या की, कसई - दोडामार्ग नगरपंचायतच्या विविध विकास कामे, माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण, आणि प्राणी जन्म नियंत्रण यासारख्या महत्वाच्या विषयावर भर देऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने अधिक काटेकोर नियोजन करावे असे आदेश यावेळी जिल्हाधिकारी यांनी नगरपंचायतला दिले.