LIVE UPDATES

सनातन संस्थेच्यावतीने 'गुरुपौर्णिमा महोत्सवाचे' आयोजन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 26, 2026 19:10 PM
views 16  views

सिंधुदुर्ग : 'अमेरिका-इराण युद्धा' ची झळ भारतीयांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद, 'लव्ह जिहाद', 'लँड जिहाद', धर्मांतर, गोहत्या आदी समस्यांत 'कॉर्पोरेट जिहाद', 'जैविक जिहाद' यांसह नव्या संकटांची भर पडली आहे. सामान्य व्यक्तीला वरीलपैकी कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागू शकते. अशा संकटसमयी काय करावे, याचे उत्तर भारताचे अद्वितीयत्व असलेल्या गुरु-शिष्य परंपरेने आधीच देऊन ठेवले आहे. ते समाजापर्यंत पोहचवावे, यासाठी सनातन संस्था यंदाचा 'गुरुपौर्णिमा महोत्सव' हा 'रामराज्याच्या निर्मितीची दिशा स्पष्ट करणारा उत्सव म्हणून साजरा करत आहे. 

दरम्यान हा उत्सव बुधवार, २९ जुलै या दिवशी होत आहे. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगु, मल्याळम् आदी विविध भाषांमध्ये देशभरात ८९ ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, देवगड, मालवण आणि वेंगुर्ले अशा सहा ठिकाणी होणार आहेत. या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प. पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन, सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य यावर लघुपट, धर्मरक्षक आणि हिंदुनिष्ठ यांचे सत्कार, राष्ट्रभक्त अन् धर्मनिष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, रामराज्याच्या स्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप, तसेच 'रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि दिशा' या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. या महोत्सवात ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे. याबाबतचे प्रसिध्दिपत्रक संस्थेच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.