LIVE UPDATES

वेंगुर्ल्यात ‘हवेपासून खतनिर्मिती’चे प्रशिक्षण

१ सप्टेंबरला एकदिवसीय कार्यशाळा | खतांच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आश्वासक उपक्रम | गूळ, पाणी आणि विरजणाच्या माध्यमातून जैविक खतनिर्मितीचे मार्गदर्शन
Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: August 31, 2026 14:06 PM
views 28  views

वेंगुर्ला : खतांच्या वाढत्या किमती आणि रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे शेतीचा वाढता खर्च, तसेच माती, पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ल्यात एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हवेतील घटकांचे वनस्पतींसाठी उपयुक्त पोषकद्रव्यांमध्ये रूपांतर करून जैविक खतनिर्मिती करण्याची पद्धत विकसित केल्याचा दावा वेंगुर्ल्यातील अजितकुमार परब यांनी केला आहे.

परब यांच्या माहितीनुसार, या पद्धतीच्या माध्यमातून घरच्या घरी जैविक खत तयार करता येते. यासाठी गूळ, पाणी आणि विरजण एवढ्याच निविष्ठांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्यप्रदेशातील शेकडो शेतकरी या पद्धतीचा वापर करत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे खतांवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचा दावा सहभागी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शेती अधिक स्वावलंबी आणि कमी खर्चाची करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरू शकते, असा आयोजकांचा विश्वास आहे.

१ सप्टेंबरला वेंगुर्ल्यात कार्यशाळा

या अभिनव खतनिर्मिती पद्धतीचे सखोल मार्गदर्शन करण्यासाठी १ सप्टेंबर रोजी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील हापूस सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या कार्यशाळेत जैविक खतनिर्मितीच्या पद्धतीसोबतच वनस्पतींचे रोगनिवारण, गुरांचे आरोग्य, तसेच परिसरातील स्वच्छता आणि शुद्धता याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.

प्रवेश शुल्क ₹१००; WhatsApp द्वारे नावनोंदणी

अजितकुमार परब यांच्या आयोजनाखाली होणाऱ्या या कार्यशाळेचे प्रवेश शुल्क ₹१०० ठेवण्यात आले आहे. इच्छुकांनी नावनोंदणीसाठी 9031852020 या क्रमांकावर WhatsApp द्वारे आपले नाव पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेती, आरोग्य आणि पर्यावरण यांविषयी आस्था असलेल्या व्यक्तींनी या कार्यशाळेत आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन कल्की परिवारातर्फे करण्यात आले आहे.