LIVE UPDATES

गणेशोत्सवातील विशेष रेल्वेसाठी पालकमंत्री नितेश राणेंचे आभार

कोकणच्या चाकरमान्यांसाठी मोदी एक्स्प्रेसची सेवा देणारे नेतृत्व मिळणे भाग्याचे : बंड्या नारकर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 31, 2026 13:30 PM
views 60  views

देवगड : गणेशोत्सवानिमित्त मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी गेली १४ वर्षे सातत्याने विशेष रेल्वेसेवेचा पाठपुरावा करणारे पालकमंत्री नितेश राणे यांचे कोकणवासीय चाकरमान्यांनी आभार मानले आहेत.

यावर्षीही मुंबईहून कोकणात, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांसाठी दोन ‘मोदी एक्स्प्रेस’ विशेष रेल्वे उपलब्ध करून देण्यात आल्याने चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सातत्याने विशेष रेल्वेची व्यवस्था करून त्यांचा प्रवास सुखकर करणारे नितेश राणे यांच्यासारखे नेतृत्व कोकणवासीयांना मिळणे हे भाग्यच आहे,’ असे मत पडेल मंडळाचे भाजप अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांनी व्यक्त केले.

गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी केवळ धार्मिक उत्सव नसून आपल्या गावाशी, मातीशी आणि कुटुंबाशी नाळ जोडणारा भावनिक सण आहे. मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांत नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेले चाकरमानी वर्षभर गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात.

बाप्पाच्या आगमनाबरोबरच आपल्या गावाकडे परतण्याची ओढ त्यांच्या मनात असते. मात्र गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी प्रवासी गर्दी आणि मर्यादित वाहतूक व्यवस्था यामुळे प्रवासाचे मोठे आव्हान निर्माण होत असते. ही बाब लक्षात घेऊन चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी विशेष रेल्वेसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.

गेल्या १४ वर्षांपासून ‘मोदी एक्स्प्रेस’च्या माध्यमातून गणेशभक्त चाकरमान्यांना सुखकर व मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. यंदाही दोन विशेष रेल्वे उपलब्ध करून देण्यात आल्याने मुंबईसह विविध भागांतील कोकणवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने हजारो चाकरमानी आपल्या गावाकडे परततात. या प्रवासात त्यांना सुरक्षित, आरामदायी आणि सुलभ वाहतूक सुविधा मिळणे आवश्यक आहे. विशेष रेल्वेमुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असून, बाप्पाच्या दर्शनासाठी गावाकडे परतण्याचा प्रवास अधिक सुकर झाला आहे.

‘चाकरमान्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या मनात निर्माण होणारे समाधान यापेक्षा मोठे समाधान कोणते असू शकते? कोकणच्या माणसांसाठी आणि त्यांच्या सुखकर प्रवासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नेतृत्वाला मनापासून सलाम,’ अशी भावना बंड्या नारकर यांनी व्यक्त केली.

दरम्यान, गणपती बाप्पाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्याला अधिक बळ द्यावे, कोकणसेवेची त्यांना अधिक शक्ती मिळावी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कोकणचा विकास अधिक वेगाने व्हावा, अशी प्रार्थनाही कोकणवासीय चाकरमान्यांनी व्यक्त केली आहे.