LIVE UPDATES

मोकाट जनावरे अचानक आडवी आल्याने दुचाकीचा अपघात

महिला सुदैवाने बचावल्या : कणकवलीत मोकाट जनावरांचा उपद्रव
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 31, 2026 13:42 PM
views 195  views

कणकवली : कणकवली शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, नागरिकांच्या जीवितासह वाहनांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी सायंकाळी तेली आळी ते डीपी रोडदरम्यान मोकाट जनावरे अचानक दुचाकीसमोर आडवी आल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, दुचाकीवरील दोन्ही महिला सुदैवाने बचावल्या.

कणकवली शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहरातील विविध रस्त्यांवर सुमारे ३० ते ४० छोटी-मोठी जनावरे फिरताना दिसत असून, अनेकदा ही जनावरे सर्विस रस्त्यावर तसेच अंतर्गत रस्ते व महामार्गावर  बसून राहतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढला आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्याच्या मधोमध जनावरे उभी राहत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे यापूर्वीही मोकाट जनावरांमुळे किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात घडले आहेत. रविवारी झालेल्या अपघातामुळे पुन्हा एकदा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मोकाट जनावरांमुळे केवळ वाहतुकीची समस्या निर्माण होत नसून, व्यापाऱ्यांच्या दुकानाबाहेर ठेवलेले धान्य, भाजीपाला तसेच इतर साहित्य खाल्ल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. काही जनावरे थेट नागरिकांच्या घरांमध्ये घुसून त्रास देत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगरपंचायतीने ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मोकाट जनावरे ठेवण्यासाठी गोपुरी आश्रमा जवळील जागेची पाहणी केली होती. त्यामुळे आता मोकाट जनावरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देत हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून, नगरपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.