
रत्नागिरी : रत्नागिरीचा जीडीपी गेल्या २० वर्षांच्या तुलनेत कित्येक पटीने वाढला असून, यात स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि दुकानदारांचा मोठा वाटा आहे. स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेत २,१५९ कोटींची गुंतवणूक केली आहे. हे सर्व प्रकल्प १०० टक्के पूर्ण करून पुढील वर्षी ५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा नवा संकल्प आपण पूर्ण करू, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी केले.
रत्नागिरीतील जिल्हा गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत ६२ उद्योग घटकांशी 2 हजार 159 कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणूकीतून मोठ्याप्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. तरुणांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि केंद्राच्या विश्वकर्मा योजनेचा लाभ घेऊन स्टार्टअप्स उभारावेत आणि नोकरी देणारे बनावे," असे आवाहन त्यांनी केले. तसेच रत्नागिरीत होणारा सेमीकंडक्टर प्रकल्पासाठीची जमीन व्हीआयटीकडून काढून ती आरआरपी या कंपनीला दिली जाणार असल्याचे आज स्पष्ट करण्यात आले.
आज झालेल्या करारात जिल्ह्यातील पर्यटन आणि आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्राला बळ मिळणार आहे. यामध्ये एमआयडीसीच्या जागेत एक्सप्रेस ग्रुप पंचतारांकित हॉटेल उभारणार आहे. तसेच ७, ८ आणि ९ सप्टेंबरला स्टील उद्योगाचा मार्ग मोकळा होत असून, त्यातून १० हजार स्थानिकांना रोजगार मिळेल.
निवेंडी, वाटद आणि मेर्वी येथे नव्या प्रदूषण विरहित एमआयडीसी उभारल्या आहेत. त्याचबरोबर जयगड येथे आनंद महिंद्रा यांच्या पंचतारांकित हॉटेलचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यासाठी आज झालेले करार
- एक्सप्रेस इनची फाईव्ह स्टार हॉटेलसाठी 100 कोटी गुंतवणूक
- पोर्ट शिपायार्ड प्रायव्हेट लिमिटेडचे १,४१३ कोटी गुंतवणूक
- सोलरमध्ये ३५ कोटी गुंतवणूक
- फिशरिजमध्ये १० कोटी गुंतवणूक
- स्पेशियालिटी केमिकलमध्ये 15 कोटी गुंतवणूक










