
वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनिष दळवी मित्रमंडळ, वायंगणी यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय, वायंगणी येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी आणि पात्र नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होता यावे, या उद्देशाने नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३५ नागरिकांनी नवीन मतदार म्हणून नोंदणी केली.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, आडेली पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, दाभोली पंचायत समिती सदस्या शितल राऊत, वायंगणी सरपंच दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक मॅडम, भाजप तालुका प्रमुख पपू परब यांच्यासह वायंगणी उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच वायंगणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसाचा उत्सव केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमासोबत नवीन मतदार नोंदणीचा उपक्रम राबविण्यात आल्याने या सामाजिक उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.










