
सिंधुदुर्गनगरी : नवनगर प्राधिकरण रहिवासी संघ, सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आणि ऐतिहासिक नाट्यप्रयोग ' इथे ओशाळला मृत्यू ' यांचे आयोजन सोमवार, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर,मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेंबूडकर, भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल,जि. प. सदस्या सुप्रिया वालावलकर , प्राधिकरण सदस्य महेश पारकर तसेच ओरोस, रानबांबुळी आणि अणाव ग्रामपंचायतींचे सरपंच व सदस्य यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.
लोकार्पण सोहळ्यानंतर शिवगणेश प्रॉडक्शन्स, सिंधुदुर्ग-मुंबई निर्मित, प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि गणेश ठाकूर दिग्दर्शित 'इथे ओशाळला मृत्यू' या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि शौर्याची गाथा उलगडणाऱ्या या नाटकामुळे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण वाढले आहे. नवनगर प्राधिकरण रहिवासी संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून विकासकामांचे लोकार्पण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा संगम अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार असून, सिंधुदुर्गनगरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.










