
वेंगुर्ले : तालुक्यातील शून्य शिक्षकी असलेल्या शाळांबाबत तसेच पटसंख्या जास्त असून शिक्षक आवश्यक असलेल्या प्राथमिक शाळांबाबत आज शनिवारी वेंगुर्ला पंचायत समितीत सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत तालुक्यात ज्या शाळांमध्ये ९ किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या आहे व त्या शाळेत २ शिक्षक आहेत यातील एका शिक्षकांना शून्य शिक्षकी असणाऱ्या शाळेत नेमणुका देण्यात आल्या. तर ज्या शाळांची पटसंख्या ३० ते ४० किंवा त्यापेक्षा जास्त आहे व त्या शालेत शिक्षक कमी आहेत अशा शाळेत कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकही करण्यात आली.
१५ जुन पासून जिल्ह्यातील शाळा उन्हाळी सुट्टी नंतर सुरू होत असून याबाबत दिनांक ११ जून रोजी पंचायत समिती सभापती दालनात शिक्षकांच्या नियोजनाबाबत बैठक संपन्न झाली होती. या बैठकीला सभापती शंकर घारे व जि.प शिक्षण सभापती प्रितेश राऊळ उपस्थित होते. या बैठकीत १ ते ९ पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांना १ शिक्षक व १० च्या वर पटसंख्या असलेल्या शाळांना पटसंख्येनुसार २ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षक देण्याचे ठरवण्यात आले होते. तसेच याबाबत सर्व केंद्रप्रमुखांची बैठक लावून याबाबत नियोजन करण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार आज शनिवारी (१३ जून) तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
यावेळी जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, पं स सभापती शंकर घारे, उपसभापती सचिन देसाई, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, केळुस सरपंच योगेश शेटये, होडावडा उपसरपंच राजबा सावंत, अजित राऊळ, तुषार साळगावकर, श्रीकृष्ण कोंडस्कर यांच्यासहित सर्व केंद्रप्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत शून्य शिक्षकी शाळा असलेल्या परुळे आंबेगाळी शाळेला म्हापण क्र. १ मधील शिक्षक हिरालाल वाघमारे, परुळे आनंदवाडी शाळेला भोगवे निवती शाळेतील येथील ऋतुजा म्हैसकर, परुळे चिपी शाळेला भोगवे दुतोंड शाळेतील आशिष तेंभुर्णे, पेंडूर नाईकवाडा शाळेला मातोंड गावठण शाळेतील पोपट शिंदे, उभादांडा आडारी शाळेला उभादांडा भेंडमळा शाळेतील मेदिनी रेडकर यांची नेमणूक करण्यात आली.तर रेडी गावतळे शाळेचा शून्य पट असून यावर्षी त्याशाळेत मुले आल्यास रेडी सुकाळभाट शाळेतील शिक्षकांकडे हा चार्ज सोपवण्यात आला.










