
सावंतवाडी : राजकीय वैमनस्यातून बदनामी केल्याचा पाणीपुरवठा सभापतींचा दावा धूळफेक करणारा आहे. हा विषय राजकारणाचा नसून जनतेच्या पैशांच्या अपहाराचा आहे. ज्या कर्मचाऱ्याने स्वतः गैरव्यवहाराची कबुली दिली त्यालाच पोलीस तक्रारीत फिर्यादी केल जात आहे. त्यामुळे चोरालाच फिर्यादी करणे सभापतींना मान्य आहे का ? असा सवाल पाणीपुरवठा समिती सदस्या नगरसेविका शर्वरी धारगळकर व ॲड. सायली दुभाषी करत प्रत्युत्तर दिले आहे. तसेच या प्रकरणाची विभागीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाणीपुरवठा सभापतींनी केलेल्या विधानवर पाणी पुरवठा समितीच्या सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. बैठकीत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि स्वतः सभापतींच्या उपस्थितीत या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय झाला होता.
मात्र, महिना उलटून गेला तरीही चौकशी सुरू का झाली नाही ? जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात कोणता पाठपुरावा केला ? पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे सविस्तर चौकशीची मागणी का करण्यात आली नाही ? असा सवाल करत सभापतींनी केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा पाणीपुरवठा समितीची तातडीची बैठक बोलावून या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आव्हान नगरसेविका सौ. धारगळकर व सौ. दुभाषी यांनी दिल आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत ज्या कर्मचाऱ्यांने अडीच लाख रुपये भरण्याचे मान्य केले तसेच ऑडिटच्या नावाखाली दीड लाख रुपये घेतल्याची कबुली दिली. मात्र, या कबुलीची नोंद अधिकृत ठरावात का केली गेली नाही ? असा सवाल केला.
तर नळ साहित्याचे रजिस्टर गहाळ झाल्याप्रकरणी त्याच कर्मचाऱ्याला फिर्याद द्यायला सांगितली जात असून चोरालाच फिर्यादी करणे सभापतींना मान्य आहे का ? गैरव्यवहाराची कबुली देणारा कर्मचारीच फिर्यादी कसा होऊ शकतो ? याचे उत्तर सभापतींनी द्यावे.
गेल्या महिनाभरात या प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न झाले असून प्रशासनावर सभापतींचा कोणताही वचक राहिलेला नाही. त्यामुळे सभापतींचा राजीनामा का मागू नये ? असा सवालही त्यांनी केला. जनतेच्या करातून आलेल्या पैशांचा अपव्यय होऊ नये. न.प. च्या पारदर्शकतेचा हा प्रश्न असून घोटाळ्यात सामील दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत स्वस्त बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.










