
कुडाळ : शिवसेनेचे कार्य हे सदैव समाजहिताला प्राधान्य देणारे राहिले आहे. सत्ता असो वा नसो, जनतेचा पाठिंबा हीच आमची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते वैभव नाईक यांनी केले. कुडाळ येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर आणि दशावतारी कलाकारांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यकर्त्यांच्या उपक्रमांचे कौतुक
यावेळी वैभव नाईक यांनी कार्यक्रमाचे आयोजक मंदार शिरसाठ आणि सर्व कार्यकर्त्यांचे विशेष आभार मानले. "रक्तदान आणि कलाकारांचा सन्मान हे स्तुत्य उपक्रम आहेतच, पण मंदार शिरसाठ यांनी रिक्षाचालकांना विमा संरक्षण देण्याचे जे पाऊल उचलले आहे, ते अत्यंत कौतुकास्पद आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले. पराभवानंतरही जनतेने दिलेल्या प्रेमामुळे आपल्याला जनसेवेची नवी ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
वैभव नाईक यांनी आपल्या भाषणात सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. "आम्ही सत्तेसाठी लाचार न होता विरोधात राहून जनतेचे प्रश्न मांडत आहोत. आंबा-काजू बागायतदारांसाठी काढलेल्या मोर्चामुळे आमच्यावर गुन्हे दाखल झाले, पण आम्ही डगमगणार नाही." ओरस येथील अतिवृष्टीग्रस्त, भातशेती नुकसान भरपाई आणि एमआरजीएसचे पैसे अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत. पालकमंत्री आणि खासदारांनी दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत. महिला व बाल रुग्णालयाची दुरावस्था झाली असून, शासकीय मेडिकल कॉलेजचे काम केवळ 'टक्केवारी'साठी सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेनेत फूट पडली होती, ज्याचा खुलासा खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच केला होता, याची आठवण त्यांनी करून दिली.
आपल्या खास शैलीत विरोधकांना टोला लगावताना नाईक म्हणाले, "बंगे अयोध्येला काय मी जाणार नाही, मी कुडाळ-वालावलच्या देवळात मी दर्शन घेतो. देवाकडे मी एवढेच मागतो की, कोणासमोर हात पसरायला लावू नको आणि कोणाच्या दबावामुळे झुकू देऊ नको. लाचार होण्यापेक्षा स्वाभिमानाने जनतेसाठी काम करत राहणे हीच माझी इच्छा आहे."











