
वैभववाडी: करुळ घाटातील एका वळणावर पेट्रोल -डिझेल घेऊन सिंधुदुर्गात येणारा टँकर पलटी झाला आहे.हा अपघात आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडला.यात चालक हा किरकोळ जखमी झाला आहे. मिरज येथून पेट्रोल व डिझेल घेऊन चालक (एमएच ०७एस १२३४)हा टँकर घेऊन सिंधुदुर्गात येत होता.दरम्यान करुळ घाटात टँकर आला असता,चालकाचा गाडीवरील ताबा सुटला.त्यानंतर टँकर गटारात पलटी झाला.त्यामुळे टँकर मधील पेट्रोल व डिझेल काही प्रमाणात वाहत होते.या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर,हरिष जायभाय, श्री माने आदी घटनास्थळी पोहोचले.त्यांनी चालकाला सुखरूप बाहेर काढले.इंधन गळतीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कणकवली अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.या पथकाच्या माध्यमातून अपघातस्थळी पाणी मारून मार्ग सुरक्षित करण्यात आला.या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.तासाभरानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.










