मालवण पंचायत समितीसमोर अतिक्रमण प्रकरणी उपोषण

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: March 25, 2026 20:24 PM
views 13  views

मालवण : आपल्या मालकीच्या जागेत दुसऱ्याने घरकुल योजनेतून घर बांधत अतिक्रमण केले आहे. मालवण पंचायत समितीच्या या गैरकारभाराची, नियमबाह्य घरकूल योजना लाभार्थीची चौकशी करून होणारा शासकीय निधी थांबवून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी यासाठी नांदोस येथील  नंदकिशोर शांताराम मेस्त्री, प्रमोद शांताराम मेस्त्री यांनी मालवण पंचायत समिती समोर उपोषणास सुरुवात केली. 

मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, गाव मौजे नांदोस, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग, स. न. १७४, ही. नं. २२ व क्षेत्र-०-०९-७९ ही आमचे स्व मालकी हक्काची जमीन, भोगावाट वहिवाटीची जमीन असून, आम्ही सदर मिळकतीत वास्तव्यास आहोत. स. न. १७४, ही. नं. २२ ब मध्ये अतिक्रमण करून दमदाटी व दादागिरीने करण्याचे काम काहीजण करत आहेत. घरकुल योजनेतून घराचे काम सुरु केले आहे.  अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे काम सुरु आहे. तक्रारी करूनही आज पर्यंत कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई न करता घरकुल योजनेचा पहिला हप्ता पण संबंधितांना देण्यात आल्याचे समजले.  तेव्हा या सर्व भोंगळ, अराजक, मनमानी गैरप्रकारची चौकशी केली जाऊन तात्काळ घरकुल योजना अनुदान अदा करण्यात स्थगिती देण्यात यावी. तसेच संबंधितावर ठोस कारवाई करण्यात यावी. अन्यथा पंचायत समिती, मालवण येथील कार्यालयासमोर आमच्या कुटुंबियांसह आमरण उपोषणास बसणार आहोत. असा इशारा दिला होता. मात्र, कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप करत मेस्त्री कुटुंबियांनी उपोषणा सुरु केले.