
सिंधुदुर्गनगरी :सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदांच्या निवडणुका बुधवारी अत्यंत शांततेत आणि बिनविरोध पार पडल्या. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांनी सत्तेचे समसमान वाटप करत समन्वयाचा संदेश दिला.
मालवण तालुक्यातील संतोष साठविलकर यांना पुन्हा वित्त व बांधकाम सभापतीपदी संधी देण्यात आली, तर वेंगुर्ल्याचे प्रितेश राऊळ यांची शिक्षण व आरोग्य सभापतीपदी पुनर्निवड करण्यात आली. कणकवली तालुक्यातील रुहिता तांबे यांना समाज कल्याण सभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली असून देवगड तालुक्यातील नारकर यांच्याकडे महिला व बालकल्याण सभापतीपद सोपविण्यात आले.
दहा दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद अध्यक्षपदी प्रमोद कामत आणि उपाध्यक्षपदी तुकाराम साइल यांची निवड झाली होती. त्यानंतर बुधवारी विषय समिती सभापती पदांची निवडणूक पार पडली.
सकाळी सुमारे ११ वाजता पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारांची नावे आणि खात्यांचे वाटप जाहीर करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ही माहिती सदस्यांना दिली. त्यानंतर महायुतीच्या सर्व सदस्यांनी चारही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.
दुपारी तीन वाजता सभा सुरू होताच प्रत्येक पदासाठी एकच अर्ज आल्याने चारही उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पिठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी शारदा पवार यांनी काम पाहिले. त्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांचे सहकार्य लाभले. निवडीनंतर अध्यक्ष व सभापतींनी मनोगते व्यक्त करत विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही प्रशासनाकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
निवड प्रक्रिया अवघ्या १५-२० मिनिटांत पूर्ण झाली. त्यानंतर नवनिर्वाचित सभापतींना शुभेच्छा देण्यासाठी सदस्य व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचे उत्साहात अभिनंदन केले. संतोष साठविलकर आणि प्रितेश राऊळ यांना यापूर्वीचा अनुभव असल्याने पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर रुहिता तांबे आणि नारकर यांना प्रथमच महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे.
सत्तेचा समतोल साधण्याचा प्रयत्न
भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत ५० पैकी ४१ जागांवर विजय मिळवला. त्यात भाजपचे २७ आणि शिवसेनेचे १४ सदस्य आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापती अशी एकूण सहा पदे असताना त्यापैकी तीन पदे भाजपकडे आणि तीन पदे शिवसेनेकडे देण्यात आली आहेत. या समसमान वाटपामुळे महायुतीतील समन्वय टिकवण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसून येत असून भविष्यात पदांची अदलाबदल होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.










