
दोडामार्ग : सामाजिक व ग्रामीण विकास क्षेत्रात सातत्याने भरीव कार्य करणाऱ्या दोडामार्ग येथील सौ. सीमा सदानंद प्रसादी यांचा गोव्यात राज्यस्तरीय पातळीवर गौरव करण्यात आला. जनशिक्षण संस्था, गोवा यांच्या वतीने त्यांना “कौशल्य शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार” प्रदान करून नुकतेच सन्मानित करण्यात आले.
गोवा राज्यातील महिलांना विविध क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यात दिलेल्या मोलाच्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार गोवा जनशिक्षण संस्थेच्या अध्यक्ष विश्रांती देसाई प्रदान करण्यात आला. दोडामार्गसारख्या ग्रामीण भागातून कार्य करत असताना त्यांनी शेकडो महिलांना रोजगारक्षम बनवून समाजात आदर्श निर्माण केला आहे.
सन २००४ पासून जनशिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जागृती व प्रशिक्षणाच्या कार्याला सुरुवात केली. २००७ पासून व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रमांना गती देत त्यांनी महिलांना विविध कौशल्यांमध्ये प्राविण्य मिळवून दिले. २०१८ पासून नवीन प्रशिक्षण उपक्रम राबवून स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या प्रशिक्षण उपक्रमांत शिवणकला, ब्युटी पार्लर, फॅशन डिझाईन, कुकरी, काथ्या उद्योग, केळीच्या कोकपासून आकर्षक वस्तू तयार करणे, अगरबत्ती व मेणबत्ती निर्मिती, शंख-शिंपल्यांपासून सजावटी वस्तू तयार करणे, तसेच कपड्यांपासून विविध पिशव्या बनविणे यांसारख्या कौशल्याधारित अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे अनेक महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू करून कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीत मोलाचा वाटा उचलला आहे.
सौ. प्रसादी या संचालक असलेल्या ‘चैतन्य प्रशिक्षण संस्था’ ही शासनमान्य संस्था असून, या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत शेकडो महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, प्रशिक्षितांपैकी ९० टक्क्यांहून अधिक महिलांना रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध झाला आहे, ही या कार्याची मोठी जमेची बाजू ठरली आहे.
कोरोना काळात (२० जानेवारी २०२० ते २१ एप्रिल २०२२) सर्वत्र लॉकडाऊन व निर्बंध असताना त्यांनी शिवभोजन योजनेअंतर्गत गरजूंसाठी अन्नसेवा देत सामाजिक बांधिलकी जपली. या सेवाभावी कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
सध्या देखील दोडामार्ग व तालुक्यातील ग्रामीण भागात खेडोपाडी जाऊन युवक-युवतींना प्रत्यक्ष उद्योग प्रशिक्षण देण्याचे कार्य त्या सातत्याने करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्या कार्यरत असून, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीत मोलाचा वाटा उचलत आहेत.
त्यांच्या या सर्वांगीण कार्याची दखल घेत जनशिक्षण संस्था, गोवा यांनी त्यांना राज्यस्तरीय कौशल्य शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










