जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर दोडामार्गात वैभव नाईकांचं जंगी स्वागत

Edited by: लवू परब
Published on: April 30, 2026 16:10 PM
views 65  views

दोडामार्ग : सत्ता येते जाते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना टिकवण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाने आपल्याकडे जबाबदारी दिली आहे. सिंधुदुर्गात पुन्हा एकदा आपल्याला शिवसेना संघटना उभी करायची आहे त्यामुळे सर्वांनी विभाग निहाय कामाला लागा आम्ही तुमच्या सोबत आहोत असे प्रतिपादन नूतन जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांनी केले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्यानंतर प्रथमच दोडामार्ग तालुक्यात आलेल्या वैभव नाईकांचं जंगी स्वागत करण्यात आले. शिवसेना जिंदाबाद, वैभव नाईक तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, कोण आला रे कोण आला शिवसेना वाघ आला अशी घोषणाबाजी याप्रसंगी करण्यात आली. यावेळी वैभव नाईक यांनी दोडामार्ग पिंपळेश्वर देवस्थानला पुष्पहार अर्पण कररून पायी चालत संपर्क कार्यालयात गेले. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी सावंतवाडी विधानसभाप्रमुख रुपेश राऊळ, दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस, युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे, उपतालुकाप्रमुख संदेश राणे, नगरसेवक रामराव गावकर, मिलिंद नाईक, संतोष मोर्ये, गणेश धुरी, श्याम खडपकर, विजय जाधव, लक्ष्मण जाधव, भिवा  गवस, प्रदीप सावंत, महिला प्रमुख विनिता घाडी,जेनीफर लोबो आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी वैभव नाईक बोलताना म्हणाले की मागील काही वर्षात जिल्ह्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हंत्ती व इतर वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आंबा काजू बागायत नुकसानीचे अजून पंचमनामे झाले नाहीत. अदानीच्या स्मार्ट मिटरचे भरमसाठ बिल येत आहे. या सर्व प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी आहे. तसेच पक्ष संघटना वाढविण्यासाठी विभागनिहाय सभा आयोजित करून जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र आणून प्रवाहाबाहेर गेलेल्याना एकत्र आणून संघटना वाढविली जाईल, आपण सर्वांनी मेहनत घेऊया आणि नवीन चेहऱ्यांना संधी देऊया युवा संघटना ही मोठ्या जोमात वाढवूया.

माजी जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी अनुपस्थितीत

नूतन जिल्हाप्रमुखपदी वैभव नाईक यांनी पदभार हाती घेतल्यानंतर प्रथमच दोडामार्ग तालुक्यात दौरा काढला. यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र माजी जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी उपस्थिती नव्हते ते नेमक्या कोणत्या कारणासाठी उपस्थित नव्हते, हे मात्र कळू शकले नाही.