कोटकामते खुडी येथील शेतकरी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती

पं. स. सभापती गणेश राणेंची मध्यस्थी फलदायी
Edited by: स्वप्नील लोके
Published on: April 30, 2026 16:22 PM
views 128  views

१ मेच्या “न्याय भिक्षा आंदोलनाचा निर्णय स्थगित

देवगड : देवगड तालुक्यातील कोटकामते खुडी येथील २२ शेतकरी व ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १ मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “न्याय भिक्षा आंदोलन” करण्याचा इशारा दिला होता. मात्र पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीमुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

दि. ३० एप्रिल २०२६ रोजी पंचायत समिती देवगड येथील सभापती दालनात श्री. गणेश राणे यांच्या उपस्थितीत शेतकरी व ग्रामस्थांसोबत सकारात्मक व सविस्तर चर्चा पार पडली. या चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर समाधानकारक तोडगा काढण्याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन देण्यात आले. परिणामी, कोटकामते खुडी येथील ग्रामस्थांनी १ मे रोजी प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

यासंदर्भात ग्रामस्थांनी सभापती श्री. गणेश राणे यांना निवेदन सादर करून आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे अधिकृतरीत्या कळविले. सभापती गणेश राणे यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि प्रभावी मध्यस्थीमुळे आंदोलन टळल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी विस्तार अधिकारी (ग्रा.प.) तुषार हळदणकर, स्वीय सहाय्यक दिपक मयेकर, सहाय्यक अभियंता रोशन सुर्यवंशी आदी उपस्थित होते.