
वैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील तळेरे-गगनबावडा मार्गालगत अतिक्रमण करून उभारलेल्या ५६ इमारत मालकांना महामार्ग प्रशासनाच्या न्यायालयाकडून अतिक्रमण हटविण्याबाबत प्राथमिक नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गालगतच्या इमारत मालकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, यातील बहुतांश अतिक्रमणे वैभववाडी शहर व परिसरातील असल्याने शहरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रीय महामार्गालगतची अनधिकृत बांधकामे, ढाबे, हॉटेल्स, दुकाने आणि इतर व्यावसायिक अतिक्रमणे हटविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकार तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निर्देश दिले आहेत. रस्ते अपघातांना आळा घालण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर महामार्ग प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेच्या प्राथमिक कार्यवाहीला वेग दिला आहे.
तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी सुमारे ८४ किलोमीटर आहे. या मार्गाचे सध्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून, आतापर्यंत सुमारे ५० किलोमीटर अंतराचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. या महामार्गालगत अनेक वर्षांपासून असलेल्या अतिक्रमणांसोबतच अलीकडच्या काळातही मोठ्या प्रमाणात नवीन बांधकामे झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
तळेरे-गगनबावडा हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग सिंधुदुर्गच्या कार्यक्षेत्रात येतो. या मार्गावरील अतिक्रमणांच्या प्राथमिक पाहणीनंतर महामार्ग प्रशासनाच्या न्यायालयाने ५६ इमारतमालकांना नोटीस बजावली आहे. काही मालमत्ताधारकांना नोटीस प्रत्यक्ष देण्यात आली असून, काहींना टपालाद्वारे पाठविण्यात आली आहे. तर काही इमारतींवर नोटीस चिकटविण्यात आली आहे.नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत संबंधितांना काही हरकत असल्यास ती उपविभागीय अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, खारेपाटण यांच्याकडे सादर करावी लागणार आहे. तसेच नोटीस प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत संबंधित अतिक्रमण हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पावसाळ्यात कारवाईची टांगती तलवार
सध्या पावसाळा सुरू असतानाच महामार्ग प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्याने इमारतमालकांसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. विशेषतः वैभववाडी शहर व लगतच्या परिसरातील अनेक मालमत्तांचा या ५६ अतिक्रमणांमध्ये समावेश असल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई होणार असल्याने प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे शाखा अभियंता यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला आहे.त्यांनी म्हटले आहे की,“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हद्दीतील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्राथमिक नोटीस बजाविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.










