LIVE UPDATES

कणकवलीतील मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लागणार

नगराध्यक्ष संदेश पारकर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 21, 2026 11:04 AM
views 100  views
#kokansadlive#news update#konkan update#

कणकवली : मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या समस्येची गंभीर दखल घेत कणकवली नगरपंचायत आता ॲक्शन मोडमध्ये आली आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासोबतच भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीमही प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीने हालचाली सुरू केल्या आहेत.

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्बीजीकरणाचे काम सुरू असून, याचबरोबर कुत्र्यांसाठी स्वतंत्र सेंटर उभारण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी गुरांसाठी असलेल्या कोंडवाड्याचा नव्याने वापर करण्याबाबत नगरपंचायतीकडून निर्णय घेतला जाणार आहे.

यापूर्वी गोपुरी आश्रमाच्या परिसरातील जागेचा कोंडवाड्यासाठी नगरपंचायतीकडून वापर करण्यात येत होता. आता याच पार्श्वभूमीवर गोपुरी आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांशी नगरपंचायतीने चर्चा सुरू केली आहे.

कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, बाळू मेस्त्री आणि विनायक सापळे यांची भेट घेतली. यावेळी मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गोपुरी आश्रमाच्या हद्दीत असलेल्या दोन जागांची पाहणी करून त्या ठिकाणी कोंडवाडा तसेच कुत्र्यांसाठी आवश्यक सेंटर उभारण्याच्या दृष्टीने जागांची पाहणी करण्यात आली.शहरातील नागरिकांना मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून कायमस्वरूपी दिलासा कसा मिळेल, यासाठी हा एक महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पाहणीदरम्यान सांगितले.

विशेष म्हणजे, गोपुरी आश्रमाच्या वतीने कोंडवाडा उभारण्यासाठी संमती दर्शविण्यात आली असून, या जागेचा कायमस्वरूपी वापर नगरपंचायतीला करता यावा, याबाबतही सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कणकवली शहरातील मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.