लोकाभिमुख नेतृत्व म्हणजे अजित पवार : उमेश गावळणकर

बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने वाहिली आदरांजली
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: January 29, 2026 17:29 PM
views 18  views

कुडाळ :  मतभेद, प्रांतभेद व पक्षभेद विसरून लोकाभिमुख कार्य करणारे, सर्वसामान्यांचे आधारवड असलेले, प्रशासनावर आपल्या अभ्यासूपणाने पकड असलेले लोकोत्तर व्यक्तिमत्व म्हणजे अजित दादा होय." असे उद्गार चेअरमन उमेश गाळवणकर यांनी काढले ते बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये   उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये अजित दादा पवार यांच्या स्वभावाचा मोठेपण वर्णन करताना रोखठोक स्पष्टवक्तेपणा, तेवढाच हळवा स्वभाव व शब्द पाळणारे कुशल प्रशासक म्हणून त्यांचं कौतुक केले. समाज हिताचा निर्णय घेताना कधीही टीका-विरोधाचा त्यांनी विचार केला नाही. सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे त्यांच्या हिताचे निर्णय घेणारे दादा असल्यामुळे कार्यकर्त्यांना ते आपलेसे वाटणारे नेतृत्व होते. म्हणूनच त्यांना कामाचा माणूस या  उपाधीने गौरविण्यात येई. लोकांना हवाहवासा वाटणारा प्रशासनातील लोकनेता यांचे असे अपघाती अकाली निघून जाणे हे मनाला चटका लावणारे व अस्वस्थ करणारे आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी जेव्हा लोकनेत्याची गरज वाटेल तेव्हा अजित दादा पवार यांची उणीव भासल्याशिवाय राहणार नाही.

दादांचं नसणं हे दुःख पचविण्याची परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती देवो व त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना करून त्यांना आदरांजली अर्पण केली. समाज हिताचे कार्य करणाऱ्या प्रति आपण सर्वांनी अशा प्रकारची सहवेदना जपली पाहिजे. असे सांगत त्यांच्या कुटुंबीयांच्या  सुखदुःखामध्ये आपण सहभागी होऊया असे विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहनही केली.

 प्रा.अरुण मर्गज यांनी त्यांना आदरांजली अर्पण करत असताना "अजित दादा पवार यांचा खमकेपणा, त्यांची धडाडी, त्यांची कडक शिस्त व त्यांचा वक्तशीरपणा, मिश्किल स्वभाव व प्रशासनावर पकड असलेल्या स्वभावाची,राजकीय कारकीर्दीच्या चढत्या आलेखाची उपस्थितांना ओळख करून दिली. त्यांच्या कुटुंबीय प्रति सहवेदना व्यक्त केली. 

यावेळी त्यांच्या सोबत बॅ. नाथ पै  बी. एड. कॉलेजचे प्राचार्य परेश धावडे, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, पल्लवी कामत व  विविध शिक्षणक्रमाचे विद्यार्थी शिक्षक बहुसंख्येने  उपस्थित होते