
सावंतवाडी : राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे. त्यांच्या निधनामुळे सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकणाने आपला हक्काचा माणूस गमावला आहे, अशा भावना व्यक्त करत सावंतवाडी येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात या शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्तब्धता पाळत आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना प्रा. सतीश बागवे म्हणाले की, अजित पवार यांच्यासारखा स्पष्टवक्ता आणि धडाडीचा नेता पुन्हा होणे नाही. त्यांनी कधीही जात-पात पाहिली नाही, केवळ समाजसेवा हाच त्यांचा ध्यास होता.
जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक ॲड. संतोष सावंत यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, "अर्थमंत्री म्हणून काम करताना त्यांनी कोकणच्या विकासासाठी नेहमीच झुकते माप दिले. शेतकरी, पशुसंवर्धन आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची त्यांना जाण होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला बहुजन हिताचा वसा त्यांनी आयुष्यभर जपला. मराठा समाजाच्या तरुणांनी उद्योग आणि व्यवसायात प्रगती करावी, यासाठी अजित दादांनी नेहमीच विशेष प्रयत्न केले. पुंडलिक दळवी यांनी त्यांच्या जवळच्या आठवणी सांगताना नमूद केले की, मंत्रालयात कोकणातील माणूस गेल्यास त्याला ते प्रथम प्राधान्य द्यायचे. सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी दिलेले शब्द आणि तत्परता ही त्यांच्या कामाच्या पद्धतीची ओळख होती.
याप्रसंगी विनय गायकवाड यांनी दादांच्या महान व्यक्तित्वाचे पैलू उलगडले, तर नगरसेवक देवेंद्र टेमकर आणि मायकल डिसोजा यांनी "गोरगरिबांचा हक्काचा माणूस गेला" अशा शब्दांत शोक व्यक्त केला. स्मृती जपण्यासाठी उपक्रम राबवणार अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत यांनी सांगितले की, अजित दादांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी महासंघातर्फे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातील, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. या शोक सभेला विशाल सावंत, अभिजित सावंत, मनोज घाटकर, दिगंबर नाईक, धोंडी दळवी, बापू राऊळ, आनंद नाईक, शांताराम पारधी, मनीष गावडे मराठा समाजाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











