
सावंतवाडी : शहरामधील बाहेरचा वाडा येथील पेट्रोल पंपाजवळील एका घरावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत २७ हजार ५०० रुपयांच्या रोकडसह सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे
बाहेरचा वाडा येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या घराच्या गच्चीवरील खोलीत काही लोक एकत्र जमून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाड टाकण्याचे नियोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. खंदरकर, सपोनी बाळू सावळ, हवालदार महेश जाधव,मनोज राऊत,मयूर सावंत, हनुमंत धोत्रे यांचा समावेश होता.
पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य आणि मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे, ज्यामध्ये २७ हजार,५०० रुपये, वाहने ३ मोटार सायकली, मोबाईल १३ नग मिळून एकूण अंदाजे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्या संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.











