
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. कुडाळ तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम. ऐश्वर्या काळुशे आणि तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ईव्हीएम कमिशनिंग (EVM Commissioning) संदर्भात विशेष प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. निवडणूक प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या ईव्हीएम (EVM) मशिनची तपासणी, सीलिंग आणि प्रत्यक्ष मतदानासाठीची तयारी यावर या प्रशिक्षणात भर देण्यात आला. निवडणुकीच्या काळात तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी आणि पारदर्शक पद्धतीने मतदान पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. या प्रशिक्षण वर्गाला कुडाळ तालुक्यातील खालील स्तरावरील अधिकारी सर्व क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी या प्रशिक्षणाला उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, "निवडणूक प्रक्रिया निर्दोष पार पाडणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ईव्हीएम कमिशनिंगच्या वेळी अत्यंत सूक्ष्म बारकावे लक्षात घेणे गरजेचे आहे." तहसीलदार सचिन पाटील यांनी क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या संभाव्य अडचणी आणि त्यावरील उपायांबाबत मार्गदर्शन केले.
ईव्हीएम मशिनची जोडणी आणि बॅलेट युनिट, कंट्रोल युनिटची हाताळणी यांचे प्रात्यक्षिक. सीलिंग प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्याबाबत विशेष सूचना. निवडणूक प्रक्रियेतील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा. या प्रशिक्षणामुळे कुडाळ तालुक्यातील निवडणूक यंत्रणा अधिक सक्षम झाली असून, आगामी निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसून येत आहे.











