
कणकवली : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था मुंबई संचलित 'मुक्तांगण प्रीस्कूल', कणकवली यांच्या वतीने “एक राखी – आपल्या रक्षणकर्त्यांसाठी” हा विशेष आणि स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला.
अहोरात्र समाजाचे आणि देशाचे रक्षण करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस बांधवांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. यावेळी मुक्तांगण प्रीस्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कणकवली पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना स्नेहाची राखी बांधली.
चिमुकल्यांच्या या उपक्रमामुळे पोलीस ठाण्यात अत्यंत उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते. "देशाचे रक्षण करणाऱ्या हातांसाठी, प्रेमाची एक राखी!" ही भावना मनी बाळगून विद्यार्थ्यांनी घेतलेल्या या पुढाकाराचे पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्याकडून कौतुक करण्यात आले.
या प्रसंगी मुक्तांगण प्रीस्कूलच्या कणकवलीच्या संचालिका प्रणाली सावंत,शिक्षक,विद्यार्थी , कणकवली पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव आणि पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मुक्तांगणतर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.










