LIVE UPDATES

प्रत्येक बालकापर्यंत पोलिओचे दोन थेंब पोहोचलेच पाहिजेत

शिल्पा खोत यांचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 28, 2026 15:45 PM
views 60  views

मालवण : भारत सरकारच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या पोलिओ निर्मूलन विशेष मोहिमेचा सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान अध्यक्षा, वाइल्ड लाईफ रेस्क्यूअर सल्लागार, सेवते प्रतिष्ठान अध्यक्षा तसेच स्वराज्य संघटना अध्यक्षा शिल्पा खोत यांनी आढावा घेतला. पाच वर्षांखालील प्रत्येक बालकापर्यंत पोलिओचे दोन थेंब पोहोचणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, पालकांनी या मोहिमेत शंभर टक्के सहभाग नोंदवावा, असे आवाहन खोत यांनी केले.

यावेळी शिल्पा खोत म्हणाल्या, "पोलिओ ही भारत सरकारने पाच वर्षांखालील सर्व मुलांना पोलिओ या गंभीर आजारापासून वाचवण्यासाठी सुरू केलेली विशेष मोहीम आहे. या मोहिमेत सर्व बालकांना पोलिओचे 'दोन थेंब' पाजले जातात. भारत पोलिओमुक्त झाला असला, तरी भविष्यात या आजाराचा धोका टाळण्यासाठी नियमित लसीकरणासोबत हा अतिरिक्त डोस देणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक माता-पित्याने आपल्या पाच वर्षांखालील पाल्याला न विसरता पोलिओचे दोन थेंब द्यावेत आणि या मोहिमेला शंभर टक्के प्रतिसाद द्यावा."

यावेळी शिल्पा खोत यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. सिंधुदुर्ग जिल्हा कायम पोलिओमुक्त राहण्यासाठी सर्व नागरिक, पालक, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मोहिमेचे प्रभावी नियोजन केल्याबद्दल डॉ. बालाजी पाटील यांचे शिल्पा खोत यांनी विशेष अभिनंदन केले. आरोग्य विभागाने केलेले नियोजन वाखाणण्याजोगे असून प्रत्येक बालकापर्यंत पोलिओचे दोन थेंब पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा अत्यंत तत्परतेने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.