LIVE UPDATES

तुळसच्या सांस्कृतिक परंपरेला देऊळवाडा मंडळाचा हातभार

युवा मंडळाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार : संजू परब
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 15, 2026 08:08 PM
views 108  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

वेंगुर्ला : तुळस गावाला मोठा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असून, येथील श्री देव जैतीर मंदिर हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ असल्याने या गावाला विशेष महत्त्व आहे. आमदार दीपक केसरकर यांनी तुळस गावातील विकासकामांना नेहमीच झुकते माप दिले असून, यापुढेही गावातील कोणतेही विकासकाम असो, हक्काने हाक मारा, मी कायम तुमच्या पाठीशी उभा राहीन, अशी ग्वाही शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी तुळस येथे दिली.

     यशवंत (बाळू) परब मित्रमंडळ व आर.सी.सी. ग्रुप देऊळवाडा, तुळस यांच्या वतीने आयोजित दीपावली शो टाईम २०२६ च्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (१४ नोव्हेंबर) शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी कार्यक्रमाला भेट देत मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले.

त्यावेळी तालुकाप्रमुख बाळा दळवी, या दीपावली शो टाईमचे पुरस्कर्ते तथा पं स माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब, ज्येष्ठ पदाधिकारी अण्णा वजराटकर, वेताळ प्रतिष्ठान तुळसचे अध्यक्ष सचिन परुळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सॅविअर फर्नांडिस, सावंतवाडी युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, तुळसचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य जयवंत तुळसकर, आडेली विभागप्रमुख मितेश परब, मातोंड ग्रामपंचायत सदस्य दिपेश परब, पोलीस पाटील सौ. राऊळ यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

    यावेळी पुढे बोलताना संजू परब म्हणाले की, गावातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे काम येथील मंडळे आणि युवा कार्यकर्ते सातत्याने करत आहेत.  तुळस गावात बाळू परब यांचे गेली अनेक वर्षे सुरू असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. देऊळवाडा येथील हे मंडळही सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. अशा युवा मंडळांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे राहणार असल्याचे संजू परब यांनी स्पष्ट केले. मी एकदा कोणाच्या पाठीशी उभा राहिलो, तर शेवटपर्यंत साथ देतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

    जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या विकासकामांच्या दृष्टिकोनाचा उल्लेख करताना, ते कोणत्याही गावाला विकासकामांसाठी निधी देताना पक्षभेद पाहत नाहीत, असे सांगितले. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजूट कायम ठेवावी. मंडळासाठी जे काही सांगाल, ते करण्याची आमची तयारी आहे. तुळस गावाला विकासात्मक कामे मिळवून देण्यासाठी अग्रस्थानी राहून आमचा नेहमीच प्रयत्न असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी बाळू परब यांच्या सामाजिक वाटचालीचे कौतुक करत देऊळवाडा मंडळाच्या विविध उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले. आभार प्रदर्शन करताना यशवंत (बाळू) परब यांनी गावातील सर्व युवा वर्गाला एकत्र घेऊन चालणारे हे मंडळ असल्याचे सांगितले. मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात आपण नेहमीच त्यांच्या सोबत असतो. क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. आगामी काळातही अशाच प्रकारे विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.