
सिंधुदुर्ग : भरत केसरकर) : सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासात अनेक नेत्यांनी विकासाची स्वप्ने दाखवली, अनेकांनी आश्वासने दिली, अनेकांनी विकासाचे आराखडे मांडले. मात्र, काही प्रकल्प असे असतात की त्यांची उभारणी झाली तरी त्यांना अपेक्षित गती मिळत नाही.
चिपी विमानतळ हा त्यापैकीच एक प्रकल्प !
विमानतळ उभा राहिला, धावपट्टी तयार झाली, विमानांचे आगमनही झाले; पण सिंधुदुर्गवासीयांच्या अपेक्षेप्रमाणे नियमित आणि सक्षम विमानसेवा सुरू राहिली नाही. त्यामुळे विमानतळ असूनही त्याचा अपेक्षित फायदा जिल्ह्याला मिळत नसल्याची खंत कायम होती.आज मात्र या परिस्थितीत बदल घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडत आहे. आज १६ नोव्हेंबरपासून चिपी विमानतळावरून सिंधुदुर्ग-नवी मुंबई विमानसेवा सुरू होण्याची घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. फ्लाय ९१ कंपनीच्या माध्यमातून आठवड्याचे सातही दिवस ही सेवा सुरू करण्याचा निर्णय म्हणजे जिल्ह्याच्या विकासाला मिळालेली नवी दिशा आहे.म्हणूनच आज प्रश्न केवळ विमानसेवेचा नाही. प्रश्न आहे तो एका जिल्ह्याच्या विकासाच्या महत्त्वाकांक्षेचा! प्रश्न आहे तो कोकणातील तरुणांच्या भविष्याचा! आणि प्रश्न आहे तो सिंधुदुर्गला पर्यटनाच्या जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे आणण्याचा!अखेर पालकमंत्री नितेश राणे यांनी चिपी विमानतळाचा विषय केवळ चर्चेत न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीच्या टप्प्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या पुढाकाराची दखल घेणे आवश्यक आहे.
नारायण राणेंनी पाहिलेले स्वप्न ; नितेश राणेंनी पुढे नेलेला विकासाचा ध्यास
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचा इतिहास लिहिताना माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या योगदानाचा उल्लेख अपरिहार्य आहे. १९९९ मध्ये सिंधुदुर्गला पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करण्याची संकल्पना पुढे आली, तेव्हा अनेकांसाठी पर्यटन म्हणजे समुद्रकिनारे, हॉटेल्स आणि पर्यटकांची गर्दी एवढेच चित्र होते. मात्र, पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचे आर्थिक उत्पन्न वाढवणे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, कृषी आणि मत्स्यव्यवसायाला बाजारपेठ मिळवून देणे आणि सिंधुदुर्गला स्वतंत्र आर्थिक ओळख निर्माण करून देणे, हा त्यामागील व्यापक विचार होता.
चिपी विमानतळाची उभारणी ही त्याच दूरदृष्टीचा एक भाग होती
मात्र, विकासाचा प्रकल्प उभा करणे आणि तो प्रत्यक्षात यशस्वीपणे चालवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. चिपी विमानतळाच्या बाबतीत दुसरा टप्पा अनेक वर्षे अडचणींचा ठरला.आता याच प्रकल्पाला नियमित विमानसेवेच्या माध्यमातून नवी ऊर्जा देण्याचे काम पालकमंत्री नितेश राणे यांनी हाती घेतले आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी पाहिलेल्या पर्यटन विकासाच्या स्वप्नाला पुढील टप्प्यावर नेण्याचा हा प्रयत्न म्हणून या घडामोडीकडे पाहावे लागेल.दूरदृष्टी खासदार नारायण राणेंची, जिल्ह्याच्या विकासासाठी पुढाकार आमदार निलेश राणेंचा आणि चिपी विमानसेवेला गती देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणेंचा पाठपुरावा, अशी ही विकासाच्या सातत्याची राजकीय साखळी आहे.
केवळ घोषणा नाही, तर मंत्रालयापासून विमानतळापर्यंतचा पाठपुरावा !
राजकारणात घोषणा करणे सोपे असते. एखाद्या प्रकल्पाचे श्रेय घेणेही अवघड नसते. मात्र, एखादा प्रकल्प अडचणीत असताना त्यातील तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय अडथळे दूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे ही खरी कसोटी असते.चिपी विमानतळाच्या बाबतीतही अनेक प्रश्न होते.विमानतळापर्यंत पोहोचणाऱ्या रस्त्यांची स्थिती, विजेची उपलब्धता, रात्रीच्या विमानसेवेसाठी आवश्यक सुविधा, विमानसेवेची आर्थिक व्यवहार्यता, विमान कंपन्यांचा सहभाग आणि व्हायबिलिटी गॅप फंडिंग अर्थात व्हीजीएफ यांसारखे विषय मार्गी लावणे आवश्यक होते.या प्रश्नांवर विमानतळ प्रशासन, राज्य सरकार आणि संबंधित विभागांशी बैठका घेऊन पाठपुरावा केल्याचे नितेश राणे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.विशेष बाब म्हणून सिंधुदुर्ग विमानतळासाठी काही निर्णय घ्यावे लागल्याचेही त्यांनी सांगितले.याचा अर्थ असा की, चिपी विमानतळाच्या प्रश्नाकडे केवळ जिल्हास्तरीय विषय म्हणून न पाहता शासनस्तरावर त्याचा पाठपुरावा करण्याची भूमिका घेण्यात आली.राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान असण्याचा खरा उपयोग काय, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. आपल्या जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी मंत्रालयात आवाज उठवणे, निर्णय मिळवणे आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे, हीच त्या पदाची खरी जबाबदारी असते.त्या दृष्टीने नितेश राणे यांचा चिपी विमानतळासाठीचा पुढाकार महत्त्वाचा ठरतो.
चिपी ते नवी मुंबई ! आता सिंधुदुर्ग मुंबईपासून आणखी जवळ
१६ नोव्हेंबरपासून फ्लाय ९१च्या माध्यमातून चिपी-नवी मुंबई आणि नवी मुंबई-चिपी अशी विमानसेवा सुरू होण्याची घोषणा जिल्ह्यासाठी मोठी बातमी आहे.आजपर्यंत सिंधुदुर्गातून मुंबई गाठण्यासाठी रस्ते किंवा रेल्वेचा पर्याय वापरावा लागत होता. लांबचा प्रवास, वाहतुकीची कोंडी, वेळेचे नियोजन आणि प्रवासाचा थकवा यामुळे अनेक पर्यटक आणि व्यावसायिकांसाठी सिंधुदुर्गला येणे काहीसे वेळखाऊ ठरत होते.आता थेट विमानसेवेचा पर्याय उपलब्ध झाल्यास प्रवास अधिक सुलभ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील पर्यटकांना सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यांवर येणे सोपे होईल. व्यावसायिकांना जिल्ह्यातील पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी प्रवास सुलभ होईल. परदेशातून येणाऱ्या पर्यटकांनाही मुंबईमार्गे सिंधुदुर्ग गाठण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. म्हणजेच चिपी विमानतळ केवळ सिंधुदुर्गचा विमानतळ राहणार नाही, तर तो कोकणच्या पर्यटन विकासाचा महत्त्वाचा प्रवेशमार्ग बनू शकतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे.एका बाजूला अथांग अरबी समुद्र, दुसऱ्या बाजूला हिरव्यागार सह्याद्रीच्या पर्वतरांगा, नारळी-पोफळीच्या बागा, आंबा-काजूच्या वाड्या, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि समृद्ध कोकणी संस्कृती!तारकर्ली, देवबाग, भोगवे, निवती, वेंगुर्ला, शिरोडा, कुणकेश्वर, विजयदुर्ग, देवगड आणि आंबोली अशी पर्यटनस्थळे केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर देशातील आणि परदेशातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरू शकतात.मग प्रश्न असा आहे की, एवढी पर्यटनसंपन्न भूमी असूनही सिंधुदुर्गला अपेक्षित पर्यटनविकास का मिळाला नाही?याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे कनेक्टिव्हिटी!पर्यटनस्थळे सुंदर असणे पुरेसे नसते. त्या ठिकाणी पोहोचणे सोपे असले पाहिजे. पर्यटकांना चांगली वाहतूक, निवास, खाद्यसंस्कृती, मार्गदर्शन आणि सुरक्षिततेच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत.चिपी विमानतळाच्या माध्यमातून या सर्व गोष्टींना एक नवी जोड मिळू शकते.विमानाने मुंबईतून सिंधुदुर्गात आलेला पर्यटक जर दोन-तीन दिवस जिल्ह्यात मुक्काम करणार असेल, तर त्याचा आर्थिक फायदा एका हॉटेलपुरता मर्यादित राहणार नाही. तो टॅक्सीचालक, होम स्टे चालक, स्थानिक दुकानदार, खाद्यपदार्थ विक्रेते, जलक्रीडा व्यावसायिक आणि पर्यटन मार्गदर्शक अशा अनेक घटकांपर्यंत पोहोचेल.म्हणून चिपीची विमानसेवा म्हणजे केवळ प्रवासाचे साधन नाही, तर सिंधुदुर्गच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देणारी संभाव्य आर्थिक जीवनवाहिनी आहे.
हा या संपूर्ण विकासप्रक्रियेतील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे.विमानसेवा सुरू झाली, पर्यटक आले, मोठमोठी हॉटेल्स उभी राहिली, गुंतवणूक आली, तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा स्थानिक तरुणांना मिळाला नाही, तर त्या विकासाला पूर्णत्व येणार नाही.मंत्री नितेश राणे यांनी आपल्या भाषणात स्थानिक तरुणांनी पर्यटन व्यवसायात पुढे येण्याचे केलेले आवाहन याच दृष्टीने महत्त्वाचे आहे.आज सिंधुदुर्गातील अनेक तरुण रोजगारासाठी मुंबई, पुणे, गोवा, बेंगळुरू आणि अन्य शहरांकडे धाव घेत आहेत. उच्चशिक्षित तरुणांना जिल्ह्यात संधी मिळत नाही, अशी त्यांची भावना आहे.मात्र, विमानसेवा आणि पर्यटन क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे ही परिस्थिती बदलण्याची संधी निर्माण होऊ शकते.
स्थानिकांना काय मिळू शकते ?
* स्थानिक तरुणांसाठी टूर गाईड व्यवसाय.
प्रशिक्षित टॅक्सी आणि पर्यटन वाहतूक सेवा.
आधुनिक होम स्टे आणि रिसॉर्ट व्यवस्थापन.
स्थानिक खाद्यसंस्कृतीवर आधारित व्यवसाय.
स्कूबा डायव्हिंग, पॅरासेलिंग आणि जलक्रीडा.
पर्यटन माहिती केंद्रे आणि डिजिटल बुकिंग सेवा.
स्थानिक हस्तकला, आंबा, काजू, कोकम आणि प्रक्रिया उद्योग.
पर्यटन क्षेत्रातील प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मिती.
ही संधी ओळखून तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा विचार केला पाहिजे.शासनानेही स्थानिक तरुणांसाठी प्रशिक्षण, आर्थिक मदत, व्यवसाय मार्गदर्शन आणि पर्यटनविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे.कारण सिंधुदुर्गच्या विकासाचे खरे यश विमानतळावर उतरलेल्या विमानांच्या संख्येत नाही, तर जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला मिळालेल्या कामात मोजले गेले पाहिजे.
सिंधुदुर्गमध्ये मोठ्या पर्यप्रकल्पांच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या नव्या शक्यता आहेत.वेळागरमधील ताजचा प्रस्तावित प्रकल्प असो किंवा देवगडमधील ताजशी संबंधित पर्यटन प्रकल्प असो, अशा गुंतवणुकीमुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला नवी ओळख मिळण्याची शक्यता आहे.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधांना हवाई वाहतुकीची जोड मिळाली, तर सिंधुदुर्गला उच्चस्तरीय पर्यटन बाजारपेठेत स्थान मिळवता येऊ शकते.मात्र, या विकासाचा फायदा स्थानिकांना मिळणे आवश्यक आहे.मोठे प्रकल्प उभे राहताना स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ, स्थानिक उद्योजकांना संधी आणि पारंपरिक व्यवसायांना संरक्षण मिळाले पाहिजे.आंबा, काजू, नारळ, कोकम, मासळी आणि कोकणी खाद्यसंस्कृती यांना मोठ्या पर्यटन बाजारपेठेशी जोडण्याची संधी आहे.याचबरोबर पर्यावरणाचा समतोल, समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण, स्थानिकांच्या जमिनींचे हित आणि सांस्कृतिक अस्मिता यांची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे.विकास असा हवा की, मोठ्या प्रकल्पांचे बोर्ड बाहेरच्या कंपन्यांचे असले तरी त्या प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या रोजगाराची आणि आर्थिक समृद्धीची फळे सिंधुदुर्गच्या भूमिपुत्रांच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजेत.
सिंधुदुर्गच्या राजकारणात राणे कुटुंबीयांचे स्थान वेगळे आहे. जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घडामोडींमध्ये नारायण राणे यांचे नेतृत्व आणि त्यानंतरच्या राजकीय प्रवासातील माजी खासदार आणी विद्यमान कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे व नितेश राणे यांची भूमिका चर्चेत राहिली आहे.खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गला पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करण्याची दूरदृष्टी मांडली. चिपी विमानतळासारख्या पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या प्रक्रियेला त्यातून दिशा मिळाली.माजी खासदार आणि विद्यमान कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांचीही जिल्ह्यातील विकासाच्या प्रश्नांवर राजकीय भूमिका आणि पाठपुरावा महत्त्वाचा आहे.आता पालकमंत्री नितेश राणे यांनी चिपी विमानतळाच्या नियमित विमानसेवेचा विषय पुढे नेला आहे.या सर्व प्रवासाकडे राजकीय श्रेयवादाच्या पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. कारण जिल्ह्याचा विकास हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा पक्षाचा खासगी विषय नसतो. तो संपूर्ण जिल्ह्याचा सामूहिक विषय असतो.तरीही, एखाद्या विशिष्ट टप्प्यावर एखाद्या लोकप्रतिनिधीने पुढाकार घेऊन रखडलेल्या विषयाला गती दिली असेल, तर त्याचे श्रेय देण्यासही कमीपणा वाटता कामा नये.चिपी विमानसेवेच्या नव्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराचे निश्चितच कौतुक करावे लागेल.
राजकारणात व्यक्ती बदलतात, पक्ष बदलतात, सत्तेची समीकरणे बदलतात; मात्र विकासाचे प्रकल्प कायम राहिले पाहिजेत.चिपी विमानतळाच्या बाबतीतही हीच अपेक्षा आहे.१९९९ मध्ये पर्यटन जिल्ह्याचे स्वप्न पाहिले गेले. त्यानंतर विमानतळाच्या उभारणीसाठी प्रयत्न झाले. अनेक अडचणी आल्या, अनेकदा विमानसेवेचा प्रश्न चर्चेत राहिला. आता १६ नोव्हेंबरपासून फ्लाय ९१च्या माध्यमातून नवी मुंबईशी हवाई संपर्क सुरू करण्याचा महत्त्वाचा टप्पा समोर आला आहे.या टप्प्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच उल्लेखनीय आहे.त्यांच्या राजकीय नेतृत्वाची खरी ताकद आता या विमानसेवेच्या यशस्वी अंमलबजावणीत दिसली पाहिजे. चिपी विमानतळाला नियमित प्रवासी मिळाले पाहिजेत. पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे. जिल्ह्यात नवी गुंतवणूक आली पाहिजे. स्थानिक तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि सिंधुदुर्गच्या सामान्य माणसाच्या आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल झाला पाहिजे.नितेश राणे हे राज्यातील कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रभावी भूमिका बजावू शकतात, अशी अपेक्षा आहे.
चिपी विमानसेवेच्या निमित्ताने त्यांनी विकासाचा जो मुद्दा पुढे आणला आहे, त्याला आता प्रत्यक्ष परिणामांची जोड मिळणे गरजेचे आहे.कारण विमान चिपीच्या धावपट्टीवरून उड्डाण घेईल; पण त्या विमानासोबत उड्डाण घेतले पाहिजे सिंधुदुर्गातील तरुणांच्या स्वप्नांनी!विमान नवी मुंबईत उतरेल; पण त्यातून येणाऱ्या विकासाच्या संधी प्रत्येक गावाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत!विमानसेवा सुरू होईल; पण त्यातून सिंधुदुर्गच्या पर्यटनाला, व्यापाराला, उद्योगाला आणि रोजगाराला नवी दिशा मिळाली पाहिजे!नारायण राणे यांनी पाहिलेले पर्यटन जिल्ह्याचे स्वप्न, निलेश राणे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे विकासासाठीचे प्रयत्न आणि पालकमंत्री नितेश राणे यांचा चिपी विमानसेवेसाठीचा पुढाकार, या सगळ्यांची परिणती सिंधुदुर्गच्या समृद्धीत झाली पाहिजे.आज चिपीच्या आकाशात उड्डाणाची तयारी आहे. उद्या याच विमानतळावरून देशाच्या विविध भागांशी सिंधुदुर्ग जोडला जावा, अशी अपेक्षा आहे.म्हणूनच आजचा संदेश स्पष्ट आहे. चिपीचे टेक-ऑफ... सिंधुदुर्गच्या विकासाचे टेक-ऑफ! अखेर पालकमंत्री नितेश राणेंनी करून दाखवलं... आता सिंधुदुर्गच्या विकासाला मिळणार नवी झेप!सिंधुदुर्गकरांनो, तयार राहा! विकासाच्या नव्या प्रवासासाठी, पर्यटनाच्या नव्या पर्वासाठी आणि रोजगाराच्या नव्या संधींसाठी... कारण आता चिपीच्या धावपट्टीवरून केवळ विमान उड्डाण घेणार नाही, तर सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नेही उंच भरारी घेणार आहेत!
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








