वैभववाडीत हादरली ; धरणात बुडून ३ मुलींचा मृत्यू

तिघींचे मृतदेह ताब्यात | अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम घटनास्थळी दाखल
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 13, 2026 19:53 PM
views 44  views

वैभववाडी : तालुक्यातील करुळ-जामदारवाडी येथील धरणात आंघोळीसाठी गेलेल्या तीन मुलींचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैभववाडीत धाव घेतली आहे. या तिघींचे मृतदेह आढळले असून पुढील सोपस्कारासाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आलेत.

मिळालेल्या माहितीनुसार, करुळ जामदारवाडी येथील धरणाच्या परिसरात या तीन मुली आंघोळीसाठी गेल्या होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने त्या खोल पाण्यात बुडाल्या. त्यांच्यासोबत इतरही काही जण घटनास्थळी उपस्थित होते. मात्र, त्यांना वाचवण्यात अपयश आले. या घटनेत तिघींचा बुडून दुर्दैवी अंत झाला. तन्वी अनंत माळकर (वय १६), स्वरा संदीप सुर्वे, ऋतिका संतोष पाटील ( वय १८) मृतांची नावे आहेत.

घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी तातडीने वैभववाडी गाठून परिस्थितीची पाहणी केली. तसेच विभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव हे देखील वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा सुरू केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच मृत मुलींच्या नातेवाईकांनी आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.