
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षण विभागात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई आणि त्यानंतर झालेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर आता शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणात शासनाच्या आदेशांमुळे शिक्षकांच्या भावनांशी खेळ केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून करण्यात आला आहे.
कविता शिंपी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. या दरम्यान त्या रजेवर गेल्या होत्या. मात्र, त्यानंतर जिल्हा परिषदेकडून त्यांना हजर करून न घेतल्याची चर्चा रंगली होती. याच पार्श्वभूमीवर शिक्षण उपसचिवांकडून हजर करून घेण्याच्या काढण्यात आलेल्या आदेशामुळे वातावरण अधिकच तापले आहे.
शिक्षक संघटनांचा आरोप आहे की, एका बाजूला चौकशी सुरू असताना आणि स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रियेत अनिश्चितता असताना अचानक आदेश काढून शासनाने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची केली आहे. हा निर्णय शिक्षकांच्या भावना दुखावणारा असून प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, हा निर्णय मागे घेतला नाही तर राज्यव्यापी जनआंदोलन छेडले जाईल. जिल्ह्यातील शिक्षक संघटना एकत्र येऊन आंदोलनाची रूपरेषा ठरवत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत शिक्षण विभागातील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणात शासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, चौकशी अहवाल जाहीर करावा आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी.अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे. अन्यथा हा प्रश्न केवळ एका अधिकाऱ्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करणारा ठरू शकतो.सिंधुदुर्गातील या घडामोडींमुळे शिक्षण क्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले असून, शासन आणि शिक्षक संघटनांमध्ये संघर्षाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. आता पुढे शासन काय भूमिका घेते आणि शिक्षक परिषद आंदोलनाचा इशारा प्रत्यक्षात उतरवते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अचानक माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांना हजर करून घेण्याचे आदेश देणारे पत्र महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव मो. बा. ताशिलदार यांनी काढल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर संघटना आक्रमक झाल्या आहेत तहसीलदार यांनी हे पैसे घेवून प्रकरण मॅनेज केले असा घनाघाती आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने गंभीर आरोप केला आहे. एकीकडे कविता शिंपी या भ्रष्टाचारात अखंड बुडाल्या असताना त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाची तक्रार शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि पदवीधर आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेच्या वरिष्ठ सभागृहात दाखल केली होती. यानंतर शिक्षण मंत्राने चौकशीच्या आदेश दिले होते.या चौकशीच्या आदेशानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली आणि कविता शिंपी या दोषी असल्याचे समोर आले होते. असा अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर देखील करण्यात आला होता.वैभववाडीतील विधवेचे मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे घेणारा अधिकाऱ्याला उपसचिव मो.बा ताशिलदार क्लिनचीट देतातच कसे? त्यामुळे ताशिलदार यांनी लाखो रुपये घेऊन हे प्रकरण मिटवले आहे. ताशिलदार सुद्धा या भ्रष्टाचार प्रकरणात अखंड बुडालेले असून शिक्षणमंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची खातेनीय चौकशी करून ताशिलदार यांचे तात्काळ निलंबन करावे. अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली आहे ताशिलदार सारखे भ्रष्टाचारी अधिकारी जर महाराष्ट्राच्या शिक्षण विभागात लाभत असतील तर मंत्रालयाच्या शिक्षण विभागासमोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आंदोलन छडेल आणि याला सर्वस्वी जबाबदार शिक्षण मंत्री दादा भुसे असतील असा थेट इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिला आहे.लाखो रूपयांचा व्यवहार करून कविता शिंपी यांनी उपसचिव मो.बा ताशिलदार यांच्या कडून हजर करून घेण्याचे पत्र काढून घेतले आहे. त्यामुळे विधवेचे मंगळसूत्र विकायला लावून पैसे घेणाऱ्या कविता शिंपी सारखा भ्रष्ट अधिकारी शिक्षण उपसचिवांना दिसत नाहीत का?असा थेट आरोप करत यासंदर्भात जि.प.सीईओनी जर का कविता शिंपी यांना हजर करून घेतले, तर जनमाणसामध्ये याविरुद्ध आवाज उठून जिल्हा परिषदेसमोर जनआंदोलन उभे करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिला आहे त्यामुळे कविता शिंपी यांच्या बाजूने हजर करून घेण्याचे काढलेले पत्र निश्चितच चुकीचे असून या विरोधात रान उठवणारे ठरणार आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे काय भूमिका घेतात? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.












