LIVE UPDATES

खारेपाटण बाजारपेठ बंद

तालुका निर्मितीच्या निर्धार महामेळाव्यासाठी हजारो ग्रामस्थ एकवटणार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 27, 2026 10:42 AM
views 32  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

खारेपाटण : खारेपाटण तालुका निर्मितीच्या मागणीसाठी आज खारेपाटण येथे निर्धार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महामेळाव्याला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहणार असून, तालुका निर्मितीच्या मागणीसाठी खारेपाटण परिसरातील नागरिकांनी एकजुटीचे दर्शन घडविण्याचा निर्धार केला आहे.

महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक व आवश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. व्यापारी, रिक्षा व्यावसायिक तसेच विविध सामाजिक घटकांनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे.

खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या महामेळाव्यास खारेपाटण परिसरातील सुमारे ५० गावांमधील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित राहणार आहेत.

खारेपाटण तालुका निर्मितीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तालुका निर्मिती झाल्यास नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी होऊन परिसराच्या विकासाला चालना मिळेल, अशी भूमिका कृती समितीने मांडली जात आहे.

महामेळाव्याच्या माध्यमातून शासनाचे लक्ष खारेपाटण तालुका निर्मितीच्या मागणीकडे वेधण्याचा प्रयत्न केला जाणार असून, ‘तालुका निर्मिती झालीच पाहिजे’ या मागणीसाठी आज खारेपाटणमध्ये मोठी जनएकजूट पाहायला मिळणार आहे.