
दोडामार्ग : आडाळी येथे सुरू असलेल्या कथित अवैध मायनिंगसदृश्य उत्खनन प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सत्ताधाऱ्यांची आणि भू-माफियांची मिलीभगत असल्याचा संशय बळावत आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई केल्यास आमच्या काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी केली. सरकारने विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक थांबवावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला. दोडामार्ग शहरातील हॉटेल स्नेहल रेसिडेन्सी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बाबू गवस यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शहराध्यक्ष सुधीर गवस, सुधीर चांदेलकर आदी उपस्थित होते.
भूमाफियांना नेमके अभय कोणाचे ?- आडाळी येथे सुरू असलेले उत्खनन हे साधे काम नसून एमआयडीसीच्या नावाखाली सुरू असलेला मायनिंगचा खेळ असल्याचा गंभीर आरोप बाबू गवस यांनी केला. या प्रकरणात अनेक तक्रारी झाल्या, चौकशीचे आदेश दिले गेले, नागपूर स्तरावरून दखलही घेण्यात आली मात्र प्रत्यक्ष कारवाईचा मागमूसही नाही. त्यामुळे भू-माफियांना नेमके अभय कोणाचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नागपूरहून अहवाल येण्यासाठी वेळ लागत असला तरी तोपर्यंत उत्खननातून काढली जाणारी माती इतर वैध मायनिंग प्रकल्पांमध्ये वापरली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारच्या निष्क्रियतेचा फायदा भू-माफिया घेत असून प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका त्यांनी केली.
उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनाचे नेमके झाले काय ? - उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आजपर्यंत कोणत्याही दोषीवर कारवाई झालेली दिसत नाही. जर त्यांनी खरोखरच कठोर कारवाई करून हा प्रकार थांबवला तर काँग्रेसकडून त्यांचा आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येईल, असे गवस यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून द्यावीत- आडाळीतील उत्खनन प्रकरण तसेच दोडामार्ग तालुक्यातील विविध प्रश्न राज्याच्या सुरू असलेल्या अधिवेशनात काँग्रेसचे नेते मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तालुक्यात शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा तुटवडा जाणवत असून उपलब्ध खतांचे दरही वाढले आहेत. सरकारने तातडीने खत उपलब्ध करून द्यावे. खतांच्या पोत्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र लावले जाते, त्यामुळे किमान त्यांचा आदर राखून तरी शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध करून द्यावे, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. गॅस सिलेंडर वितरणासाठी लागू करण्यात आलेल्या ओटीपी प्रणालीमुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नेटवर्कच्या समस्येमुळे अनेकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार असून सरकारने तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आमसभा आयोजित करावी- दोडामार्गमध्ये गेल्या अकरा वर्षांत आमसभा घेण्यात आलेली नाही. नागरिकांना आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार नाकारला जात असून लोकशाही प्रक्रियेची गळचेपी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. आचरा तालुक्यात प्रस्तावित हत्तीग्राम प्रकल्प लवकर सुरू झाल्यास दोडामार्ग तालुक्यातील वाढत्या हत्ती प्रश्नावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल. त्यामुळे सरकारने या प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी बाबू गवस यांनी केली.
फोटो –
दोडामार्ग – आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबू गवस. सोबत शहराध्यक्ष सुधीर गवस, सुधीर चांदेलकर.










