LIVE UPDATES

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान’ यशस्वीतेसाठी व्यापक नियोजन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 24, 2026 18:01 PM
views 40  views

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियान’ अंतर्गत तालुकास्तरीय समितीची सभा नुकतीच संपन्न झाली. तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, अधिकारी लोकसहभाग, समन्वय आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यांच्या बळावर अभियानातील सर्व उद्दिष्टे पूर्ण केल्यास राज्यस्तरीय ५ कोटी रुपयांच्या बक्षिसासाठी पात्र होण्याची संधी उपलब्ध होईल, यामुळे ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पंचायत समिती यांना राज्यस्तरावर विशेष ओळख मिळेल आणि सावंतवाडी तालुक्याचे नाव उज्ज्वल होईल, असा विश्वास गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी व्यक्त केला.

या सभेच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी पंचायत समिती सावंतवाडी निलेश जाधव होते. सचिव म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर यांनी सभेचे कामकाज प्रभावीपणे पार पाडले. सभेस उपजिल्हा रुग्णालयाचे प्रतिनिधी सदस्य, गटशिक्षण अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, कृषी अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे प्रतिनिधी, सामाजिक बांधिलकी संस्थांचे प्रतिनिधी रवी जाधव, तालुका पत्रकार सदस्य विनायक गांवस तसेच विविध विभागांचे मान्यवर उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर गतवर्षी अभियानांतर्गत उद्दिष्टनिहाय झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. आज अखेरची प्रगती व विविध उद्दिष्टांच्या पूर्ततेची सद्यस्थिती सचिवांनी सभागृहासमोर मांडली. विशेषतः ८० टक्क्यांहून अधिक प्रगती केलेल्या गावांनी उर्वरित कामे पूर्ण करून १०० टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य करण्यासाठी नियोजन करण्यात आले. तसेच उर्वरित गावांनीही पुढील नऊ महिन्यांच्या कालावधीत सर्व निकष पूर्ण करण्यासाठी प्रयत्न वाढवावेत, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष निलेश जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, तालुक्यातील ग्रामपंचायतींनी सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी लोकसहभाग, समन्वय आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यांच्या बळावर अभियानातील सर्व उद्दिष्टे पूर्ण केल्यास राज्यस्तरीय ५ कोटी रुपयांच्या बक्षिसासाठी पात्र होण्याची संधी उपलब्ध होईल. यामुळे ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पंचायत समिती सावंतवाडी यांना राज्यस्तरावर विशेष ओळख मिळेल आणि सावंतवाडी तालुक्याचे नाव उज्ज्वल होईल. यावेळी अभियानातील गुणांकन वाढविण्यासाठी आवश्यक बाबींचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षेत्रातील कामांची माहिती ई-मेलद्वारे पाठविण्यात आली असून उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, त्याचा वापर व लाभ याबाबतही जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सावंतवाडी यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सभेदरम्यान उपस्थितांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले आणि अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. शेवटी आरोग्य विभागामार्फत सर्वांना अभियान यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले. उपस्थितांचे आभार शंकर परब आरोग्य सहाय्यक, सावंतवाडी यांनी मानले.