
देवगड : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांनी आज देवगड येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला भेट देत नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान नागरिकांकडून आलेल्या अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तसेच विविध संस्थांच्या व व्यक्तींच्या निवेदनांचा स्वीकार करून संबंधित विषयांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार नारायण राणे यांनी दिले.
यावेळी तालुक्यातील मच्छीमार प्रतिनिधींनी मच्छीमार बोटींसाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या डिझेलच्या वर्गीकरणासंदर्भातील समस्या खासदार राणे यांच्या निदर्शनास आणून दिली. या प्रश्नामुळे अनेक मच्छीमारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले. यावर खासदार नारायण राणे यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून या प्रश्नाचा पाठपुरावा केला जाईल व मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असे स्पष्ट आश्वासन दिले.
देवगड नगरपंचायतीच्या वतीने सभापती गणेश राणे व उपसभापती अमोल लोके यांनी खासदार नारायण राणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्याचप्रमाणे भाजपा तालुका समितीच्या वतीने तालुकाध्यक्ष राजा भूजबळ यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. शहराच्या वतीने शरद ठुकरुल तसेच सर्व नगरसेवकांनी खासदार राणे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या प्रसंगी शिवसेना पक्षाच्या वतीने तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी विविध विकासकामांशी संबंधित निवेदन खासदार नारायण राणे यांच्याकडे सादर केले. तालुक्यातील पायाभूत सुविधा, नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि प्रलंबित विकासकामांबाबत लक्ष वेधून घेत संबंधित विषयांवर सकारात्मक निर्णय व्हावा, अशी मागणी करण्यात आली.
खासदार राणे यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधताना विकासकामांना गती देण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन खासदार नारायण राणे यांचे स्वागत केले.
यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार अजित गोगटे, मिलिंद कुलकर्णी, बाळ खडपे, जिल्हा परिषद सदस्य सावी लोके, महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, सुयोगी घाडी , देवदत्त कदम, संजय बोंबडी, पंचायत समिती सदस्य संजना लाड, समृद्धी चव्हाण, अंकुश ठुकरुल, योगेश चांदोस्कर, नगरसेवक तन्वी चांदोस्कर, बुवा तारी, रोहन खेडेकर,अमोल तेली, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, नगरसेवक वैभव करंगुटकर, योगेश पाटकर, दयानंद पाटील, तसेच सर्व नगरसेवक, बूथ प्रमुख आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.










