
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा बुधवारी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत शहर विकास आराखडा, अपूर्ण नळपाणी योजना, रस्त्यांवरील खड्डे आणि वृक्षलागवड यांसारख्या शहराच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर जोरदार चर्चा झाली. बैठकीला उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासह नगरसेवक व विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
शहर विकास आराखड्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून योग्य आणि सविस्तर माहिती मिळत नसल्याने लोकांच्या मनात अनेक समस्या व शंका आहेत, अशी बाजू नगरसेवक विलास कुडाळकर यांनी मांडली. या समस्येचे गांभीर्य ओळखून मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सांगितले की, विकास आराखड्याबाबत आतापर्यंत ८६ तक्रारी प्राप्त झाल्या असून, नागरिकांचा संभ्रम दूर करण्यासाठी लवकरच एक विशेष सभा बोलावण्यात येईल.
सभेत प्रभागांमधील रखडलेल्या विकासकामांवरून नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरसेवक उदय मांजरेकर यांनी त्यांच्या प्रभागातील नळपाणी पाईपलाईनचे काम अपूर्ण असल्याकडे लक्ष वेधले. संबंधित ठेकेदार जबाबदार असून त्याची अनेक कामे प्रलंबित आहेत. हा ठेकेदार लोकप्रतिनिधींचे फोनही उचलत नसल्याचा आरोप मांजरेकर यांनी केला.
यावर उपनगराध्यक्ष किरण शिंदे आणि नगरसेवक विलास कुडाळकर यांनीही सुर मिसळत, "सदर ठेकेदाराने आमचेच नव्हे, तर स्थानिक आमदारांचे फोन घेण्याचेही टाळले आहे," असे सांगत अशा निष्काळजी ठेकेदाराला तातडीने 'काळी यादी'त टाकण्याची मागणी केली. यावर नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासनाला संबंधित ठेकेदाराला तात्काळ नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
नगरसेविका आफरीन करोल यांनी सरकारी जागेत केल्या जाणाऱ्या वृक्षलागवडीचा केवळ गाजावाजा न करता, त्यांचे योग्य संगोपन आणि संवर्धन होणे गरजेचे असल्याचे सूचित केले. याच धर्तीवर रेल्वे स्टेशन जवळील 'साईदुर्गा' येथील नगरपंचायतीच्या जागेत 'मियावाकी' पद्धतीचे घनदाट उद्यान विकसित करण्याबाबत सभेत सविस्तर चर्चा झाली.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची दुरवस्था होऊ नये, यासाठी रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे काम हाती घेण्याबाबतही या सभेत नियोजन करण्यात आले. या महत्त्वपूर्ण सर्वसाधारण सभेला नगरसेवक निलेश परब, नगरसेविका अक्षता खटावकर, ज्योती जळवी, श्रेया गवंडे, सई काळप, नयना मांजरेकर आदी उपस्थित होते.










