राजकोटवर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम युद्धपातळीवर

Edited by:
Published on: February 13, 2025 20:39 PM
views 146  views

मालवण : शहरातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या स्थितीत पुतळ्याच्या चौथर्‍याचे काम पूर्णत्वास आले आहे. या चौथर्‍याच्या वर बसविण्यात येणाऱ्या खडकांचे तीन भाग आज गाझीयाबाद येथून मालवणात दाखल झाले आहेत. ब्रांझ धातूपासून बनवण्यात आलेले हे खडकांचे भाग ज्या गाड्यांमधून आणण्यात आले. त्या गाड्या राजकोट येथे अरुंद रस्त्यामुळे जाऊ शकत नसल्याने हे भाग रेवतळे सागरी महामार्ग येथील एका जागेत उतरविण्यात आले आहेत. पर्यायी वाहनांचा वापर करून हे तिन्ही भाग राजकोट किल्ला येथे नेण्यात येणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनाला अनावरण झालेला राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. या दुर्घटनेनंतर राज्य शासनाने याठिकाणी ६० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर या ठिकाणी पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या राम सुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने या अगोदर गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम पाहिले आहे. पुतळा उभारण्याचे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानुसार राजकोट किल्ला येथे पुतळा उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. 

सद्यस्थितीत ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार आहे तेथील चौथऱ्याचे काम पूर्ण झाले आहे या चौथऱ्यावर ब्रांझ धातूपासून बनवण्यात येणारा पुतळा साकारण्यात येणार आहे यासाठी चौथर्‍याच्या वरील भागात बसविण्यात येणाऱ्या ब्रांझ धातूच्या खडकाचे काही भाग आज येथे गाझीयाबाद येथून दाखल झाले आहेत. मोठ्या ट्रक मधून हे भाग आणण्यात आले आहेत. राजकोट येथे जाणारा रस्ता हा अरुंद असल्याने हे ट्रक तेथपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. परिणामी हे तिन्ही ट्रक रेवतळे येथील सागरी महामार्ग लगतच्या एका जागेत उभे करून त्या ठिकाणी हे सर्व भाग उतरवण्यात आले आहेत. हे तिन्ही भाग अन्य वाहनांचा वापर करून राजकोट किल्ला येथे नेण्यात येणार आहेत. येत्या दोन ते अडीच महिन्यात दोन ते तीन दिवस आड करून येथे पुतळ्याचे विविध भाग दाखल होणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. 

नौदल दिनाच्या निमित्ताने राजकोट किल्ला येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा काही महिन्यात तयार करून बसवण्यात आला होता. हा पुतळा आठ महिन्यातच कोसळल्याने शिवप्रेमी मधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. समुद्रा लगतच हा राजकोट किल्ला असल्याने येथील हवामान, वादळ, पाऊस या सर्व गोष्टींचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारण्यात येत आहे. यात पुन्हा घाई होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.