
मडगाव : गोव्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासह सर्वसामान्य रुग्णांना फिजिओथेरपी आणि पुनर्वसन सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने पारुल युनिव्हर्सिटी, गोवा आणि गोवा सरकारच्या आरोग्य सेवा संचालनालयाने (DHS) पुढाकार घेतला आहे. या उपक्रमामुळे सरकारी आरोग्य संस्थांमधील फिजिओथेरपी सेवांचा विस्तार होणार असून, रुग्णांना अधिक सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमासाठी गोवा सरकारचे आरोग्य, नगर व ग्राम नियोजन, नगर विकास, महिला व बाल विकास आणि वनमंत्री विश्वजित राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या उपक्रमांतर्गत दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, मडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, बाळ्ळी आणि सामुदायिक आरोग्य केंद्र, काणकोण येथे फिजिओथेरपी सेवांचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी पारुल युनिव्हर्सिटीच्या नर्सिंग, फिजिओथेरपी तसेच अप्लाइड अँड हेल्थ सायन्सेस विभागांतील ३५० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आरोग्यसेवेचा अनुभव मिळण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी, व्यावसायिक जबाबदारी आणि समाजसेवेची भावना अधिक दृढ होणार आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण प्रयत्न मानला जात आहे.या उपक्रमासंदर्भात पारुल युनिव्हर्सिटी, गोवा येथील कॅम्पस डायरेक्टर अजय यादव हे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.
हा कार्यक्रम गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, मडगाव येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन माध्यम प्रतिनिधींना करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








