
सिंधुदुर्गनगरी : नेहमी हातात वही, पुस्तक आणि पेन घेऊन शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांनी आज पाणी वाचविण्यासाठी हातात हात घातला. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा भविष्यात उपयोग व्हावा, या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा ओरोस बुद्रुक नं.१ च्या विद्यार्थ्यांनी ओरोस देऊळवाडा येथील दत्तमंदिर नजिकच्या ओहोळ वर वनराई बंधारा उभारण्यासाठी श्रमदान केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनाचा प्रत्यक्ष धडा गिरविला.
पाणी हेच जीवन असून त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. केवळ पुस्तकातून जलसंवर्धनाचे महत्त्व शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत वनराई बंधारा उभारण्यासाठी हातभार लावला. शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा उपक्रम उत्साहात पार पडला.
पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी वनराई बंधारे उपयुक्त ठरतात. पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी अशा छोट्या-छोट्या प्रयत्नांचे महत्त्व मोठे आहे. हीच जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी शाळेने पुढाकार घेतला.
वही-पुस्तकांतून ज्ञान मिळविणारी ही मुले आज निसर्गाच्या शाळेत उतरली होती. पाण्यात उतरून बंधारा उभारण्यासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साहातून पर्यावरण संवर्धनाची तळमळ दिसून आली. लहान वयातच पाण्याचे महत्त्व समजून घेत कृतीतून त्याचे संवर्धन करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणाची जाणीव रुजविणारा हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.
दादा साईल यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक!
ओरोस बुद्रुक येथील वनराई बंधारा उभारणी उपक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी जलसंवर्धनासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या दीपलक्ष्मी पडते, सुप्रिया वालावलकर, उपसरपंच पांडुरंग मालवणकर, नागेश ओरोसकर आदी उपस्थित होते.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








