LIVE UPDATES

Sindhudurg News : गड-किल्ल्यांचे जतन ही सामूहिक जबाबदारी

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे ; विजयदुर्ग किल्ल्यावर ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ उपक्रम
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 26, 2026 04:58 PM
views 24  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

देवगड : भारतीय संविधानाने देशाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूलभूत मूल्ये दिली आहेत. या मूल्यांचे जतन करण्याबरोबरच आपल्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गड-किल्ल्यांचे संरक्षण, स्वच्छता आणि संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.

भारतीय संविधान दिनानिमित्त ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी आयोजित ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या विशेष उपक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी देवगडचे प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार शीतल जाधव, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण संतोष चिकणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जयदीप कुंभार, विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे सरपंच रियाज काझी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे सदस्य, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधानाचा स्वीकार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्त्वपूर्ण योगदानातून साकारलेल्या या संविधानाने देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेला दिशा दिली आहे.

विविध जाती, धर्म, भाषा आणि संस्कृतींनी नटलेल्या भारताला एकसंघ ठेवण्यात संविधानाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. संविधानातील मूल्ये केवळ समजून घेणे पुरेसे नसून ती दैनंदिन जीवनात तसेच प्रशासकीय कामकाजातही आचरणात आणली पाहिजेत. प्रत्येक नागरिकाने आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी गड-किल्ल्यांना, विशेषतः जलदुर्गांना, महत्त्वपूर्ण स्थान दिले. सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे किल्ले कोकणच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत. हे गड-किल्ले केवळ ऐतिहासिक वास्तू नसून आपल्या संस्कृतीचे, शौर्याचे आणि परंपरेचे प्रतीक आहेत.

त्यामुळे त्यांचे जतन, स्वच्छता आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्यांमध्येही ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या वतीने दर महिन्याला किल्ला परिसराची स्वच्छता करण्यात येते. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी मंडळाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून, हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी आहे. शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयातून अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात येईल. भविष्यात यापेक्षाही व्यापक स्वरूपात असे कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस असल्याचेही जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रदूषण नियंत्रण, समाजकल्याण, पर्यावरण, पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधान वाचन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन बार्टीचे समतादूत सगुण जाधव यांनी केले.