कवीकडे हवी स्वतःची स्पष्ट राजकीय भूमिका ! ; कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन !

मुंबई लोक सांस्कृतिक मंचचा गप्पा टप्पा कार्यक्रम संपन्न
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 19, 2023 16:30 PM
views 191  views

सावंतवाडी : कवी चळवळीतला असो किंवा शांतपणे लिहिणारा असो  अथवा रस्त्यावर उतरून घोषणा देणारा असो, त्याच्याकडे स्वतःची स्पष्ट राजकीय भूमिका हवी. राजकीय भूमिका म्हणजे फक्त राजकीय कविता लिहिणे नव्हे?, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी मुंबई लोक सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गप्पा टप्पा कार्यक्रमात केले.

 लोक सांस्कृतिक मंचतर्फे कवी अजय कांडर यांच्याशी गप्पा टप्पा या कार्यक्रमाचे आयोजन मुंबई आझाद मैदान जवळच्या सीपीआर कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी आता आपण लोकांचे प्रबोधन करूया! म्हणून कोणी कविता प्रबोधनाची लिहीत नाही, परंतु ज्या कवीचा जसा लिहिण्याचा पिंड असतो, तसा तो कवितेतून व्यक्त होत असतो. पण या व्यक्त होण्याला त्याची लिहिण्यामागील ठाम भूमिका असेल तर ती कविता सर्वकालीन ठरण्याची शक्यता अधिक असते, असेही कांडर यांनी आग्रहाने सांगितले.

यावेळी लोक सांस्कृतिक मंचचे राजीव देशपांडे, प्रमोद नावार, सुबोध मोरे तसेच ज्येष्ठ लेखक योगीराज बागुल, कवी डॉ. श्रीधर पवार, कवी अविनाश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अॅड. किशोर सामंत, रवींद्र मरये, कवी सफरअली इसफ, अभिनेत्री दीपा सावंत - खोत, कवी भिमराव गवळी, कवी अनंत धनसरे, का.ॅ शैलेंद्र कांबळे, का.ॅ अशोक पवार, राहुल गायकवाड, ज्येष्ठ पँथर आनंदा ओहाळ, मुकेश रेड्डी, प्रदीप नाईक, प्रा. सुनील वाघमारे, हरीष गायकवाड आदींसह विविध क्षेत्रातील बहुसंख्य साहित्य, रसिक उपस्थित होते.

 कवी कांडर पुढे म्हणाले, अलीकडे बदलत्या काळानुसार फॅशनेबल कविता लिहीण्याची एक नवी पद्धत आली आहे. परंतु कोणतीही कविता लिहीली गेल्यावर ती कोणत्याही काळाला लागू पडायला हवी. तरच ती कोणत्याही काळात टिकते. म्हणून मराठीत तुकोबा टिकलेत. अलीकडल्या काळात अपवाद वगळता एवढं गांभीर्याने काव्य लेखन करण्याचा प्रयत्न कोणी

कवी करताना दिसत नाही. स्वतःच्या समग्र जगण्याला कवी प्रामाणिकपणे सामोरे गेलो तरच आपला असा अनुभव स्वतंत्रपणे कवितेत व्यक्त होऊ शकतो. नाहीतर ती कविता उपरी ठरते. कुणाच्यातरी प्रभावाखाली लिहिली जाऊ शकते. इतरांचा प्रभाव पचवून स्वतंत्र कविता लिहिली जायला हवी. माणसाचं जगणं एवढ गुंतागुंतीच आज झाले आहे की, वेगवेगळ्या क्षणाला वेगवेगळ्या अनुभवाला त्याला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी कवीची  कसोटी लागत असते. जेवढा काळ कठीण असेल तेवढं कवीला लिहिणं आव्हानात्मक असतं आणि ते कवीच्या दृष्टीने चांगलंच असतं. पण अनुभवाचे चिंतन झाले तरच तो अनुभव उत्तम प्रकारे कवितेत मांडला जाऊ शकतो. या दृष्टीने अरुण काळे, भुजंग मेश्राम हे माझ्या पिढीतील कवी ग्रेट वाटतात. या कवींनी स्वतःची कवितेची भाषाशैली निर्माण केली. अर्थात अजूनही मराठीत खूप चांगले लिहिणारे कवी आहेत त्यांचा आदरच आपण बाळगायला हवा. मात्र अलीकडल्या काही कवींवर हिंदीतील कवींच्या कवितेचा प्रभाव दिसतो.त्यातून त्यांची कविता बाहेर पडायला हवी, असेही शेवटी निरीक्षण त्यांनी नोंदविले. कांडर यांनी या कार्यक्रमाच्या प्रारंभी आणि शेवटी आपल्या काही कवितांचे वाचन केले. त्याला उपस्थितांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला.

   यावेळी कवी कांडर यांना ग्रंथ भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.  सुबोध मोरे यांनी आभार व्यक्त केले.