
कणकवली : महावितरणने कलमठ गावासाठी नवा फिडर तयार करावा, अन्यथा शिवसेना उबाठा पक्षातर्फे स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्टला महावितरणच्या कणकवली कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा उबाठा शिवसेना तालुका संघटक राजू राठोड यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला होता. सदर काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आंदोलन मागे घ्यावे, असे विनंती लेखी पत्राद्वारे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांनी राजू राठोड यांना केली आहे. त्यानुसार राठोड यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे केले आहे. मात्र, सदर काम लवकर सुरू न झाल्यास पुन्हा उपोषण, आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री. राठोड यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
११ केव्ही खारेपाटण फिडरचे विभाजन करून कलमठ गावासाठी नवा फिडर द्यावा, अन्यथा स्वातंत्र्यदिनी आंदोलन करण्याचा इशारा राजू राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उबाठा पक्षातर्फे महावितरणला देण्यात आला होता. कलमठ गावाला ११ केव्ही खारेपाटण फिडरने वीजपुरवठा होता. सदर फिडर विभाजन हे आरडीएसएस या योजनेमध्ये प्रस्तावित आहे. विभाजनाबाबत सर्वेक्षण देखील पूर्ण झाले आहे. विभाजनासाठी उच्चदाब वाहिनीची तसेच विद्युत पायाभूत सुविधांची उभारणी करणे आवश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करणे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, न. पं. इतर विभागाच्या परवानग्या घेण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे १५ ऑगस्टचे आंदोलन स्थगित करावे, असे लेखी पत्र महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांनी राजू राठोड यांना दिले आहे. लेखी पत्र स्वीकारतेवेळी राजू राठोड यांच्यासह जितेंद्र कांबळे, विलास गुडेकर व शिवसैनिक उपस्थित होते.