
कुडाळ : तेंडोली गावात महावितरणचे केबल घालण्याचे काम चालू असून ते चुकीच्या पद्धतीने सुरु असल्याबाबत तेंडोली ग्रामस्थांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती. त्याप्रमाणे अभियंता कुलकर्णी यांनी आज महावितरण इन्फ्राचे इंजिनिअर तिडके यांना तेंडोली येथे पाठवले. तिडके यांनी स्वतः जाग्यावर जात पाहणी केली असता केबल १ ते १.५ फुटावर जमिनीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ठेकेदार यांचे मुकादम यांना त्या कमीकमी 3 फूट असल्या पाहिजेत अशा सूचना दिल्या.
तेंडोली गावाचे माजी सरपंच मंगेश प्रभू यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गेली १५ दिवस आपण अधिकाऱ्यांना फोन करत असतानाही अधिकाऱ्यांनी दाखल का घेतली नाही असा सवाल उपस्थित केला. रवळनाथ मंदिर समोर व परिसरात खोदाई केल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. गावठाण भागात शेतकऱ्यांच्या कुंपणाला लागून केबल घटल्याने भविष्यात कुंपण करताना प्राण जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले. महावितरणचे अभियंता तिडके यांनी केबल टाकताना वाळू टाकायची असते ती का टाकली नाही असे विचारले असता ठेकेदाराचे मुकादम निरुत्तर झाले. या प्रकल्पाशी संबंधित अधिकारी काळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या ठिकाणी जिओ केबल असल्याने आपण खाली जाऊ शकत नाही असे उत्तर दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. कारण जिओ च्या केबलने जीवितहानी होऊ शकत नाही परंतु ३३ के. व्ही. लाइनमुळे प्राणहानी होऊ शकते असे असतानाही ठेकेदार केबल रस्त्यापासून फक्त दिड ते दोन फुटावर केबल घातली आहे. हे काम करत असताना ठेकेदाराची माणसे वरिष्ठ लोकप्रतिनिधींची नावे सांगत आपला कार्यभाग उरकण्याचा प्रयत्न करता असल्याचे ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
कुडाळ सार्वजनिक बांधकाम उप अभियंत्यानी रास्ता खणून खराब केल्याबद्दल रीतसर पत्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. तेंडोली ग्रामपंचायत यांनी ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महावितरण कडे उपस्थित करत रीतसर पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे. या वेळी पोलीस पाटील संजय नाईक, संदीप पेडणेकर, मंगेश प्रभू,निलेश तेंडुलकर, अर्जुन सर्वेकर , पप्पू चव्हाण,आनंद मेस्त्री तसेच महावितरण अधिकाऱ्यांच्या भेटीवेळी संदेश प्रभू व विजय प्रभू उपस्थित होते.