'तो देशासाठी, मी घरासाठी'

राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा
Edited by: दीपेश परब
Published on: August 13, 2025 20:51 PM
views 9  views

वेंगुर्ला : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि कै. गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने आजी, माजी सैनिक व पोलिस यांच्या पत्नी आणि मातांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्र आणि समाज रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या जवानांच्या आणि पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या त्यांच्या पत्नी आणि मातांच्या संघर्षमय, पण अभिमानास्पद जीवनप्रवासाला शब्दरूप देण्यासाठी ही स्पर्धा एक अनोखी संधी ठरणार आहे.

पती किंवा पुत्र देशसीमेवर, किंवा समाजरक्षणाच्या जबाबदारीत व्यस्त असताना, या स्त्रियांनी घर, जबाबदाऱ्या, भावनिक संघर्ष, अपार धैर्य आणि समर्पण यांची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. त्यांच्या आत्मसन्मान, कर्तव्यपूर्ती आणि त्यागमय कथा समाजासाठी प्रेरणादायी आहेत. या अनुभवांना शब्दरूप देण्याचे व्यासपीठ म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

✦ स्पर्धेचा विषय :

“तो देशासाठी, मी घरासाठी – पण आम्ही दोघंही देशभक्त”

या विषयावर निबंध लिहितांना सैनिक, पोलिस यांच्या पत्नी किंवा मातांनी स्वतःच्या जीवनातील वास्तव अनुभव, भावनिक संघर्ष, कर्तव्यपूर्ती आणि आत्मसन्मान याबाबत मांडणी करायची आहे.

✦ नियम व अटी :

निबंध मराठी भाषेत स्व: हस्ताक्षरात कागदाच्या एका बाजूला लिहिलेला असावा.

शब्दमर्यादा: किमान ७०० ते कमाल १००० शब्द

सोबत पती किंवा पुत्र सैनिक, पोलिस असल्याचे अधिकृत दस्तऐवज (ओळखपत्र छायाप्रत किंवा अधिकृत पत्र) जोडणे आवश्यक आहे.

✦ पारितोषिके :

प्रथम क्रमांक – ₹१००० रोख, चषक व प्रमाणपत्र

द्वितीय क्रमांक – ₹७०० रोख, चषक व प्रमाणपत्र

तृतीय क्रमांक – ₹५०० रोख, चषक व प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ प्रथम – ₹२५० रोख, चषक व प्रमाणपत्र

उत्तेजनार्थ द्वितीय – ₹२५० रोख, चषक व प्रमाणपत्र


✦ निबंध पाठविण्याची अंतिम दिनांक:

०५ सप्टेंबर २०२५


✦ निबंध पाठविण्याचा पत्ता:

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस

द्वारा: प्रा. डॉ. सचिन वासुदेव परुळकर

मु.पो. तुळस, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग – ४१६५१५

✦ अधिक माहितीसाठी संपर्क:

प्रा. डॉ. सचिन परुळकर – ९४२१२ ३८०५३

        या स्पर्धेमुळे सैनिक व पोलिसांच्या कुटुंबातील महिलांचे अनुभव, त्यांचा त्याग व संघर्ष समाजासमोर येणार असून, त्यांच्या अज्ञात समर्पणाला गौरव मिळणार आहे. तरी या स्पर्धेत सहभाग घेऊन आपली कहाणी जगापर्यंत पोहोचवा, असा आवाहन आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री आणि वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.