
सावंतवाडी : संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अशा अत्यंत भीषण आणि अस्थिर परिस्थितीतून समाजाला तारण्यासाठी आता केवळ भौतिक उपाययोजना पुरेशा नाहीत. आज दिशाहीन झालेल्या समाजाला पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या आदर्शावर आधारित 'रामराज्याची' नितांत आवश्यकता आहे. मात्र, हे रामराज्य केवळ राजकीय किंवा भौतिक प्रयत्नांतून साकार होणार नाही, तर त्यासाठी समाजाला 'साधनेचे' आणि 'गुरुचरणांचे' भक्कम आध्यात्मिक अधिष्ठान असणे अनिवार्य आहे. जेव्हा समाजाची आध्यात्मिक श्रद्धा प्रत्यक्ष सुशासनात परिवर्तीत होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने रामराज्याची पहाट होते," असे ओजस्वी प्रतिपादन सनातन संस्थेचे आनंद मोंडकर यांनी केले.
सनातन संस्थेच्यावतीने २९ जुलै दिवशी येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या 'गुरुपौर्णिमा महोत्सवात' ते बोलत होते. यंदा संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, इंग्रजी, तेलुगु, मल्याळम् आदी विविध भाषांमध्ये देशभरात ८१ ठिकाणी, तर जिल्ह्यात ६ ठिकाणी हा महोत्सव संपन्न झाला. आगामी जागतिक युद्धाचे आणि आपत्काळाचे सावट पहाता, हिंदूंनी प्रथमोपचार, अग्नीशमन आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले. यावेळी माजी सैनिक सुभेदार प्रमोद नाईक आपल्या मार्गदर्शनात म्हणाले,"मानवी जीवनाचे अंतिम ध्येय हे गाडी, बंगला, पैसा किंवा भौतिक सुखसुविधा नसून ईश्वरप्राप्ती आणि ईश्वरानंदाची अनुभूती हेच आहे. ही प्राप्ती केवळ गुरुकृपेनेच शक्य होते. गुरूंची कृपा प्राप्त व्हावी, यासाठी त्यांच्या आज्ञेचे श्रद्धेने, तत्परतेने आणि निष्ठेने पालन करून नियमित साधना करणे आवश्यक आहे. आजच्या काळात जगभर युद्धसदृश वातावरण, वाढती महागाई, रोजगारातील अस्थिरता, स्पर्धात्मक जीवनशैली आणि कुटुंबांतील तणाव यांमुळे समाज अस्वस्थ झाला आहे. अशा परिस्थितीत मनःशांती, आनंद आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग म्हणजे गुरूचरणी साधना होय. सध्याचा काळ हा संक्रमणाचा असून या काळात भावपूर्ण साधना केल्यास जलद आध्यात्मिक प्रगती साधता येऊ शकते. गुरू हे ईश्वराचे सगुण स्वरूप असून गुरु-शिष्य परंपरेने इतिहासात धर्मसंस्थापना आणि समाजजागृतीचे कार्य केले आहे, असे सांगत त्यांनी आद्य शंकराचार्य, चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य तसेच रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा उल्लेख केला.
राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षणासाठी प्रत्येकाने धर्म म्हणजे काय आणि अधर्म म्हणजे काय, याचा अभ्यास करावा, तसेच स्वतःच्या गुण-दोषांचे आत्मपरीक्षण आणि समाजासमोरील आव्हानांचे आकलन आवश्यक विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय विषयांवरही आपली मते व्यक्त केली. धर्मांतर, सांस्कृतिक बदल, कुटुंबव्यवस्था, पाश्चात्त्य जीवनशैली, सामाजिक माध्यमांचा प्रभाव आणि विविध सामाजिक प्रवाह यांविषयी चिंता व्यक्त करत हिंदूंनी धर्मशिक्षण, संघटन आणि संस्कार यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच भारतीय संस्कृती, परंपरा आणि सण-उत्सव यांचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगून नियमित साधना, धर्मशिक्षण आणि समाजजागृती यांद्वारे राष्ट्र व धर्म यांच्या संरक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. या महोत्सवात प्रारंभी श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य यावर लघुपट, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश वाचन, धर्मरक्षक आणि हिंदुनिष्ठ यांचे सत्कार, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, रामराज्याच्या स्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप भावपूर्णरित्या करण्यात आला. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, मल्याळम् या भाषांत 'ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवा'चा लाभ देश-विदेशांतील हजारो भाविकांनी घेतला.










