’साहित्यप्रेमी’च्या कार्यक्रमात उलगडणार कातळशिल्पांचे गूढ

Edited by:
Published on: March 25, 2026 12:25 PM
views 60  views

सिंधुदुर्गनगरी : ‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या मार्चच्या मासिक कार्यक्रमात शनिवारी 28 मार्च रोजी अश्मयुगीन कातळशिल्पांचे गूढ उलगडणार आहे. कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत सायंकाळी 6 वाजता हे सादरीकरण करणार आहेत.

‘आम्ही साहित्यप्रेमी’चा हा तेरावा मासिक कार्यक्रम असून तो जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सोसायटीच्या सभागृहात होईल. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक, केरळ येथे जांभ्या दगडाच्या सड्यावर ही अश्मयुगीन मानवाच्या पाऊलखुणा असलेली कातळशिल्पे आढळून आली आहेत. श्री. लळीत गेली 25 वर्षे त्यांचे संशोधन आणि अभ्यास करीत आहेत. 2001 मध्ये हिवाळे येथील कातळशिल्पांचा शोध लावून त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्प संशोधनाचा पाया घातला. देशभरात विविध परिषदांमध्ये त्यांनी याबाबतचे शोधनिबंध सादर केले आहेत. या विषयांवरील त्यांचा ग्रंथही प्रसिद्ध आहे.

कातळशिल्पे हा प्रागैतिहासिक मानवी वारसा आहे. मालवण तालुक्यातील कुडोपी या ठिकाणाचा समावेश ‘युनेस्को’ने जागतिक वारसा स्थळांच्या प्राथमिक यादीत केला आहे. मानवाकृती, पक्षी, प्राणी, मासे, भौमितिक आकृत्या यांचा कातळशिल्पात समावेश असतो. ही कातळशिल्पे कोणी खोदली, कधी व का खोदली, त्यांचा उद्देश काय असावा, याबाबत या कार्यक्रमात प्रोजेक्टरवर सादरीकरण होईल. ठीक सहा वाजता सुरु होणाऱ्या या कार्यक्रमाला रसिकांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. सई लळीत यांनी केले आहे. कार्यक्रम सर्व रसिकांसाठी खुला आहे.