
वैभववाडी : तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. निमअरुळे व करुळ या गावांमध्ये गुरुवारी रात्री जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
तालुक्यात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीटांचा पाऊस झाला. निमअरुळे परिसरात वादळी वाऱ्यामुळे ट्रान्सफॉर्मर व वीज खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच श्री रावराणे यांनी रात्री घटनास्थळी भेट दिली. निमअरुळे, तसेच अन्य चार गावांतील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्याचे आदेशही देण्यात आले.
दरम्यान, करुळ जामदारवाडी येथील अनंत पांचाळ यांच्या घराचे छप्पर उडून नुकसान झाले होते. या ठिकाणीही रावराणे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच पांचाळ कुटुंबीयांना धीर देत प्रशासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ, सरपंच नरेंद्र कोलते यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची नोंद घेऊन नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.











