मुंबई - गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डेत कंटेनर पलटी

सुदैवाने मोठा अनर्थ टळला
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 27, 2026 11:18 AM
views 112  views

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, काल रात्री उशिरा तेर्सेबांबर्डे येथे एका भरधाव कंटेनरचा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला. सुदैवाने, यावेळी समोरून कोणतेही वाहन येत नसल्याने मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, MH 04 MH 9667 क्रमांकाचा कंटेनर मुंबई-गोवा महामार्गावरून कुडाळच्या दिशेने जात होता. रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास तेर्सेबांबर्डे परिसरात आला असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेला हा कंटेनर दुभाजक ओलांडून थेट विरुद्ध दिशेच्या मार्गावर जाऊन पलटी झाला.

हा अपघात अत्यंत भीषण होता, मात्र ज्यावेळी कंटेनर विरुद्ध दिशेला पलटी झाला, त्या क्षणी समोरून दुसरे कोणतेही वाहन येत नव्हते. महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात कंटेनरचे किरकोळ नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही.