
दोडामार्ग : तिलारी खोर्यातील केर, मोर्ले, हेवाळे, मेढे परिसरात गेल्या महिन्यापासून हत्तीच्या दोन कळपाने काजू, नारळ, फोफळी व अन्य वृक्षलागवड व बागायतीमध्ये हैदोस घालून शेतकऱ्यांचे जीवनमान उद्वस्त केले आहे. या तिलारी खोर्यातील सर्व आजी, माजी सरपंच, उपसरपंच यांनी एकत्रित येऊन तिलारी खोरे हत्तीमुक्त झाला पाहिजे, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे.
तिलारी हत्तीमुक्त करा अन्यथा हत्तीपासून बचाव करण्यासाठी शुट करण्याची परवानगी द्यावी, म्हणून पत्रकार परिषदेतून मागणी केली आहे. मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर यांच्याशी प्रदीर्घ चर्चा पंधरा मार्चला केली होती. याची दखल घेऊन राज्य शासन वनविभाग यांनी तात्काळ वनबाधित क्षेत्रातील गावातील उपाययोजनांबाबत कार्यवाही सुरू केली. शुक्रवारी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्यासमवेत पुन्हा बैठक झाल्यानंतर महिन्याभरात पूर्ण मोहिम होईल, अशी हमी दिली व हत्तीमुक्त तिलारी खोरे व शेती होणार असल्याची हमी प्रशासनाकडून दिल्याने आमरण उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले आहे.
यावेळी उपवनसंरक्षक रेड्डी, सहायक उपवनसंरक्षक सोनवडेकर, वनक्षेत्रपाल मुक्कनावर, प्रेमानंद देसाई, गोपाळ गवस, संतोष मोर्ये, सुुजाता मणेरिकर, सौ गवस, सौ संंजना धुमासकर उपस्थित होते.