
सिंधुदुर्गनगरी : रस्त्यावरील अपघात कमी करणे, ही प्रत्येक वाहन चालकाची जबाबदारी आहे. वाहतुकीचे नियम आणि कायद्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. काळजीपूर्वक वाहन चालऊन अपघात कमी करण्यास प्रत्येकाने प्रशासनास सहकार्य करा. असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी आजच्या रस्ता सुरक्षा अभियान २०२६ च्या कार्यक्रमात केले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समिती सिंधुदुर्ग आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग च्या वतीने १ जानेवारीपासून रस्ता सुरक्षा अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सिंधुदुर्ग जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी निवासी पोलीस उपअधीक्षक श्वेता खाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, राष्ट्रीय परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक दीपक घोडे ,जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक श्रीमती अरिफा मुल्ला, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, यांच्यासह आशिष लोकरे, संदीप भोसले, सचिन पोलादे, विनोद भोपळे, अतुल चव्हाण, संकेत सोमनाचे इत्यादी उपविभागीय परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते
रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्तावित विजय काळे यांनी करून रस्ता सुरक्षा अभियान राबवणे व त्यामागचा उद्देश याबाबत माहिती दिली. उपस्थित रिक्षाचालक संघटनाचे प्रतिनिधी, वाहनचालक, एनसीसीचे विद्यार्थी यांना रस्ता सुरक्षा बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना निवासी पोलीस उपअधीक्षक श्वेता खाडे म्हणाल्या १जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात पोलीस प्रशासनही सहभागी झाले आहे.जिल्ह्यात रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यासाठी या अभियानात जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम आणि त्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत प्रबोधन झाले पाहिजे.
यावेळी जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अरिफा मुल्ला म्हणाल्या ,आपली सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे केवळ रस्ता सुरक्षा अभियान कालावधीत नियमांचे पालन न करता वर्षाचे ३६५ दिवस वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. वेगावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहन चालविताना अत्यावश्यक असलेल्या हेल्मेटचा वापर तसेच सीटबेल्टचा वापर कटाक्षाने केला पाहिजे. तर अपघातात अनेकांचे जीव वाचू शकतात .यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार मांडताना प्रत्येकाने वाहन चालविताना स्वतःच्या जीवाबरोबर इतरांच्या जीवाला आपल्यामुळे धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन केले.
आजच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वाहतूक नियम पुस्तिका व अन्य साहित्याचे प्रकाशन करण्यात आले तर सर्वांनी रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा घेऊन शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.










