
सावंतवाडी : आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी 'दर्पण' हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी सावंतवाडी नगरपालिकेच्या पत्रकार कक्षात 'पत्रकार दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावंतवाडीतील ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर आणि अभिमन्यू लोंढे यांच्या हस्ते आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी जांभेकर यांच्या कार्याचे स्मरण करत पत्रकारितेची मूल्ये जपण्याचा संकल्प केला.
याप्रसंगी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सचिव विजय राऊत, नगरसेवक प्रतीक बांदेकर, तालुका पत्रकार संघ कार्यकारिणी सदस्य संतोष परब, मंगल नाईक-जोशी, ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल भिसे यांसह अन्य पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे नुकतेच पुरस्कार जाहीर झालेल्या पत्रकार मंगल नाईक-जोशी आणि संतोष परब यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी मराठी पत्रकारितेचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी पत्रकारांनी संघटित राहून काम करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.










